Sameer Wankhede Case : समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री | पुढारी

Sameer Wankhede Case : समीर वानखेडे प्रकरणात मुंबई पोलिसांची एन्ट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede Case) यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. त्यांच्याविरोधातील आरोपांची आता मुंबई पोलिस चौकशी करणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी सहाय्यक पोलिस आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मुंबईतील चार पोलिस स्थानकात वानखेडे यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती आहे. दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी दोन ट्विट केले. त्यात समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला. ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, “समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते”.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात रोज नवीन नवीन गौफ्यस्फोट केले जात आहेत. या प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede Case) यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. याच दरम्यान नवाब मलिक यांनी काल मंगळवारी एक ट्विट करत मोठा गौप्यस्फोट केला होता.

निनावी नावाने एनसीबी अधिकाऱ्याकडून आलेल्या पत्राचा मजकूर नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे उघड केला आहे. ‘समीर वानखेडे यांना नेहमी मीडियात चर्चेत रहावे वाटते. यासाठी त्यांनी अनेक निर्दोष लोकांना एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे. खोट्या केसेस बनविण्यासाठी समीर वानखेडे यांनी आपली एक वेगळी टीम तयार केली आहे,’ असे पत्रात नमूद केले आहे. ज्याने निनावी नावाने पत्र लिहिले आहे त्याने आपण एनसीबीचा एक कर्मचारी असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) समोर आली. खोटे आरोप, ट्विटरबाजी करुन काही होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान क्रांती रेडकर हिने दिले आहे. आरोप कोर्टात केलेले नाहीत. ट्विटर कोर्ट आहे का?. माझा नवरा खोटारडा नाही, रोज रोज काय स्पष्टीकरण द्यायचं? असे सवाल तिने उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button