BMC : पहिल्या स्थायी समिती बैठकीत कोरोना नियमावलीला हरताळ | पुढारी

BMC : पहिल्या स्थायी समिती बैठकीत कोरोना नियमावलीला हरताळ

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : BMC : राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेतील विविध समितीच्या प्रत्यक्ष बैठक सुरू झाल्या आहेत. या बैठकांमध्ये कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पण पालिका सभागृहात घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत कोविड नियमांना नगरसेवकांनी हरताळ फासला. विशेष म्हणजे प्रत्यक्ष बैठकीसाठी आग्रही असलेले भाजप नगरसेवक मास्क घालायलाही विसरले.

कोरोनामुळे मुंबई महापालिका सभागृहासह विविध समित्यांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येत होत्या.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक सुरू होत्या. त्यामुळे या बैठका प्रत्यक्ष घेण्यासाठी भाजपने असगेही भूमिका मांडत, निदर्शन केली होती. एवढेच नाही तर कोर्टातही याचिका दाखल केली. यावर कोर्टाने एकाद्या सदस्यांची प्रत्यक्ष बैठकीला बसायची इच्छा असेल तर, त्या सदस्याला बसायला द्यावे, मात्र सदस्यांना स्थायी बैठकीला बसू दिले नाही. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने कोविड नियमांचे पालन करून, प्रत्यक्ष बैठक घेण्यास परवानगी दिली. त्यानुसार मंगळवार 26 ऑक्टोबरपासून पालिकेच्या विशेष समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका झाल्या.

स्थायी समितीच्या सभागृहात नगरसेवक, अधिकारी यांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे तेथे बैठक न घेता बुधवार 27 ऑक्टोबर रोजी महापालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. पण अनेक नगरसेवक मास्क घालण्यास विसरले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अन्य अधिकाऱ्यांनी बैठक संपेपर्यंत मास्क घातला होता. मात्र सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह भाजप गटनेता प्रभाकर शिंदे, समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख, भाजप नगरसेवक कमलेश यादव, ज्योती अळवणी, राजेश्री शिरवाडकर, विनोद मिश्रा, हरीश आदी नगरसेवक मास्क घालायला विसरले. या नगरसेवकांच्या नाकाच्या खालीही मास्क नव्हता. या निष्काळजीपणाबद्धल अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Back to top button