Maharashtra Politics | वादानंतर शिवसेनेकडून नवीन जाहिरात, शिंदे सोबत फडणवीसही….

Maharashtra Politics | वादानंतर शिवसेनेकडून नवीन जाहिरात, शिंदे सोबत फडणवीसही….
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' या भाजपच्या घोषणेला छेद देत शिवसेनेने एका सर्व्हेक्षणाच्या आधारे मंगळवारी (दि,१३) केलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा दावा केला. त्याचवेळी 'राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे' अशी नवी हाक दिली. शिवसेनेच्या या जाहिरातीने राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलं. यानंतर शिंदे-फडणवीस युतीमधील संबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आज पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेने  सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाणून घ्या काय आहे जाहीरातीचे नाराजीनाट्य….(Maharashtra Politics)

जुनी जाहीरात, 'राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे'

राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण, यासंदर्भात एक सर्वेक्षण झाल्याचे नमूद करून त्या सर्वेक्षणाची जाहिरात शिवसेनेकडून काही वृत्तपत्रांमध्ये मंगळवारी (दि.१३) करण्यात आली होती. ही जाहिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो तसेच धनुष्यबाण चिन्हासह प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीतून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी राज्यातील जनतेने सर्वाधिक पसंती दिल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के पसंतीचा दावा शिवसेनेच्या या जाहिरातीतून करण्यात आला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचा संदेश देताना 'राष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात करून राज्याचे नेतृत्व आता फडणवीस यांच्याकडे नाही तर शिंदे यांच्याकडे असल्याचा थेट संदेशही या जाहिरातीतून देण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी चर्चा होवू लागली. त्यामुळे राजकीय वतुर्ळा याचे तीव्र पडसाद उमटले.

फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठरलेला दौरा अचानक रद्द केला. ते मुंबईतच थांबल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा अधिकच पसरली. मात्र, देवेंद्र फडणवीस हे अजिबात नाराज नाहीत. ते कोल्हापूरला जाणार होते. पण, त्यांच्या कानाच्या दुखण्यामुळे त्यांना किमान तीन दिवस विमान प्रवास टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी दौरा रद्द केला, अशी माहिती शिवसेना नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्यात आले. ही सल अजूनही फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये आहे. (Maharashtra Politics)

नवी जाहीरात : जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच

भाजपची नाराजी दूर करण्यासाठी आज शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनामुळे गेल्या वर्षभरापासून विकास आणि प्रगतीच्या वाटेवर राज्याची गाडी वेगाने धावतेय. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना-भाजपच्या भक्कम युतीमुळे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रांत राज्य आघाडीवर आहे. शेतकऱ्यांना सन्मान देणारे, आधार देणारे सरकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. महिलांना प्रवास सवलत आणि रोजगार संधी देण्यासाठी युतीने निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच सरकारच्या कामगिरीवर सामान्य नागरिक समाधानी आहे. जनतेच्या स्वप्नातील राज्य आकाराला येतेय. त्यामुळे नागरिकांचा कौल युतीलाच. जनतेच्या मनातील सरकार महायुतीचे आपले सरकार.

काय सांगते आकडेवारी 

जाहीरातीत असही म्हटलं आहे की, "जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच! ४९.३% जनतेचा शिंदे- फडणवीस यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद आहेत. तर प्रमुख विरोधक  २६.८% अन्य  २३.९% आहे. देशाला विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला ८४ % टक्के नागरिकांची पसंती आहे. डबल इंजिन सरकारमुळेच राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे ६२ % नागरिकांचे मत आहे. ४६.४ % नागरिकांची भाजप-शिवसेनेला पसंती. तर प्रमुख विरोधक – ३४.६ % • अन्य – १९% आहे.

या नव्या जाहीरातीच्या प्रसिद्धीवरून राजकीय वर्तूळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया काय येणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (Maharashtra Politics)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news