Ajit Pawar: राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा भाजपवाले देणार का?: अजित पवार | पुढारी

Ajit Pawar: राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा भाजपवाले देणार का?: अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने स्वत:च्या लोकप्रियतेची वृत्तपत्रातून केलेल्या जाहिरातीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. १३) पत्रकार परिषदेत सडकून टीका केली. अशी जाहीरात आजपर्यंत कधी आपण पाहिली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्त लोकप्रिय आहेत, हे भाजपला मान्य आहे का ? असा सवाल पवार  (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.

पवार (Ajit Pawar) म्हणाले की, राज्यात राज्य सरकारने मागील ३० वर्षात अशी जाहीरात केल्याचे आपण पाहिलेले नाही. राज्यातील लोकांची कामे केल्याची जाहीरात केली जाते. पण स्वत:च्या लोकप्रियतेची जाहिरात करून मुख्यमंत्र्यांनी हसे करून घेतले आहे, अशी टीका पवार यांनी केली. स्वत: किती लोकप्रिय आहे हे दाखविण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. जाहिरातीवर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते अनंत दिघे यांचा फोटो लावलेला नाही, बाळासाहेबांना शिंदे इतक्या लवकर कसे विसारले, असा खोचक सवाल पवार यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत कुणी सर्व्हे केला ? का स्वत:च ठरवून सर्वेक्षण केले आहे का ? हे पाहावे लागेल. तुम्ही इतके लोकप्रिय मग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास का टाळाटाळ करत आहात, असा सवाल करून राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा आता भाजपवाले देणार का ? या जाहिरातीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांचा खुलासा ऐकायला आवडेल, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली.

राज्यात तुमचे सरकार इतके लोकप्रिय आहे तर, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका का घेत नाही, निवडणुका घेण्यास सरकार का घाबरत आहे, असा सवाल करून सरकारने जनतेच्या मैदान उतरावे, आणि कोण किती लोकप्रिय आहे, हे सिद्ध करून दाखवावे,असे आव्हान पवार यांनी शिंदे – फडणवीस यांना दिले. शेतकऱ्यांना मदत करत आहे, हे दाखविण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली आहे. मंत्र्यांना आपल्याकडे किती स्टाफ आहे, याची माहिती नाही. फायली पेंडींगचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत, अशी टीका पवार यांनी यावेळी केली.

हेही वाचा 

Back to top button