Disaster Management : देशातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ८ हजार कोटींची तरतूद; अमित शहांची घोषणा | पुढारी

Disaster Management : देशातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ८ हजार कोटींची तरतूद; अमित शहांची घोषणा

नवी दिल्ली, १३ जून, पुढारी वृत्तसेवा, Disaster Management : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापनासाठी ८ हजार कोटींच्या निधीची तरतूद करीत तीन महत्वाच्या योजनांची घोषणा केली. शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील विज्ञान भवन येथे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती.बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून शहा यांनी योजनांची घोषणा केली.
राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी  आधुनिक सेवा आणि या सेवेच्या विस्तारासाठी ५ हजार कोटींची तरतूद केंद्राने केली आहे. तर, अडीच हजार कोटींच्या निधीतून मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे या शहरांमध्ये वाढता पुराचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. जमिनीची धूप रोखण्यासाठी केंद्राच्या योजनेनूसार ८२५ कोटी रुपयांचा निधी १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये खर्च केले जातील,अशी माहिती शहा यांनी दिली. Disaster Management
आपत्ती व्यवस्थापनात गेल्या ९ वर्षांमध्ये केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. पंरतु, गेल्या काही काळात आपत्तीचे स्वरुप बदलले असून तीव्रता आणखी वाढली आहे. या अनुषंगाने आता व्यापक योजना बनवण्याची आवश्यकता असल्याचे शहा म्हणाले.काही नवीन क्षेत्रांमध्ये आपत्तीचा धोका बळावला आहे.यासर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार व्हावे लागेल,असे शहा म्हणाले.अणू उर्जा केंद्र असलेल्या राज्यांना आपातकालीन स्थितीत कडेकोट प्रोटोकॉल देण्यात आल्याचे देखील शहा म्हणाले.

कोरोना संकटकाळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात राज्यांच्या मख्यमंत्र्यांनी एकत्रित येवून शतकातील सर्वात भीषण महारोगराईचा सामना करीत देशाला त्यातून बाहेर काढले होते. २२० कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले. लाखोंच्या संख्येत गरिबांना त्यांच्या गृह राज्यापर्यंत पोहचवण्यात आले. कुणीही उपाशी झोपू नये यासाठी उपाययोजना केल्या तसेच डीबीटीच्या माध्यमातून थेट लोकांना मदत करण्यात आली होती, याची शहांनी आठवण करून दिली. Disaster Management

यापूर्वी आपत्ती संबंधीत दृष्टिकोण केवळ दिलासा आणि पुनर्वसनापुरताच केंद्रीत होता.पंरतु, गेल्या ९ वर्षात पूर्व सूचना यंत्रणा, प्रिवेंशन, मिटिगेशन तसेच पूर्व तयारी आधारीत आपत्ती व्यवस्थापनाला सर्वांनी मिळून जमीन पातळीवर उतरवले असल्याचे शहा म्हणाले. ३५० संभावित आपत्ती प्रवण जिल्ह्यात आपत्ती मित्र योजनेअंतर्गत एक लाख तरुण स्वयंसेवकांना तयार करण्यात येत आहे. यामुळे आपत्तीच्या अनेक घटनांमध्ये सकारात्मक आणि उत्साहवर्धक परिणाम दिसून येत असल्याचे शहा म्हणाले.आपत्ती व्यवस्थापनासंबंधी केंद्राने पाठवलेला प्रस्ताव राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी लवकरात लवकर मंजूरी देण्याचा आग्रह यावेळी शहा यांनी बैठकीतून केला. राज्यांकडून आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन अशी ग्वाही देखील शहा यांनी बैठकीतून दिली. Disaster Management

हे ही वाचा :

Back to top button