World Bicycle Day : सायकलिंग - आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा अनुभव | पुढारी

World Bicycle Day : सायकलिंग - आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा अनुभव

मुंबई; विजय लाड : सायकल चालवल्याने आरोग्य तर उत्तम राहतेच, पण पैशांची बचतही होते. दररोज तासभर सायकल चालवली तर संपूर्ण दिवस उत्साहात जातो. मन प्रसन्न राहते. संसर्गजन्य रोग, वाढत्या वयानुसार जडणारे आजार, श्वसनाचे आजार, हृदयविकार आदी रोगांवर सायकलिंग रामबाण उपाय असल्याचे डॉक्टर सांगतात. सायकलला दुहेरी बचत आणि उत्तम आरोग्याचे प्रतिक समजले जाते. मुंबईतील सायकलप्रेमींची संख्या झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळ्या सायकलिंग ग्रुप्सच्या माध्यमातून सायकलप्रेमींचे एक नेटवर्क तयार झाले आहे. वेगवेगळे इव्हेंट आयोजित करण्यासह व्यक्तिमत्त्व विकासासावरही त्यात काम केले जाते. (World Bicycle Day)

सायकलिंगच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अॅम्स्टरडॅम येथील एक समाजसेवी संस्था सातत्याने काम करते. या संस्थेने प्रत्येक शहरात सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बायसीकल मेअरची संकल्पना आणली आहे. फिरोजा सुरेश या मुंबईच्या पहिल्या बायसीकल मेअर आहेत. त्यांना मुलुंड की सायकलवाली या नावानेही ओळखले जाते. फिरोजा वयाच्या सातव्या वर्षापासून सायकल चालवतात. त्यांचा एकही दिवस सायकल चालवण्यावाचून जात नाही. (World Bicycle Day)

सायकलिंगची गोडी कशी वाढवावी यावर फिरोजा सुरेश सांगतात, की कमी अंतरापासून सायकलिंगची सुरवात करायला हवी. सकाळी दूध आणायचे आहे, किरकोळ किराणा आणायचा आहे तर गाडी वापरु नका. त्याऐवजी सायकलचा वापर करा. एकदा तुम्ही सुरवात केली की घराबाहेर पडायचे असल्यास तुम्ही हमखास सायकल सोबत घेणार. तुमची सायकलिंगची रुची वाढेल. तुम्ही सायकलिंग एन्जॉय कराल. त्यानंतर सायकलिंगच्या इतर इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची तुमची इच्छा जागृत होईल. ऑफिसला जाण्यासाठीही तुम्ही सायकलचा वापर कराल. (World Bicycle Day)

मुंबईतील सायकलिंगवर फिरोजा म्हणाल्या, की मुंबईतील डबेवाले असतील किंवा इतर सायकल चालणाऱ्या व्यक्ती असतील ते कधीही सायकलिंग ट्रॅक नाही, प्रदुषण जास्त आहे अशा तक्रारी करत नाहीत. त्यामुळे लोकांनीही सायकलिंगचे फायदे लक्षात घेवून पळवाटा काढणे बंद करायला हवे. आम्ही आमच्या ”सायकल चला सिटी बचा” या उपक्रमाच्या माध्यमातून १२०० सायकल निःशुल्क वाटण्याचा निश्चय केला आहे. अशा प्रकारे मुंबईतील प्रत्येक वॉर्डात आम्ही ५० सायकल भेट देणार आहोत. त्यासाठी झोपडपट्टीवर भर देत आहोत. येथील मुलींना सायकल चालवणे शिकवण्यापासून आम्ही सुरवात करतोय. सायकलच्या माध्यमातून त्यांचे जिवनमान उंचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. (World Bicycle Day)

फिरोजा सांगातात, की कोरोनाच्या काळात लोकांचा सायकल चालवणे, धावणे, व्यायाम करणे याकडे कल वाढला होता. परंतु, आता आळशी प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे पुन्हा आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावायला सुरवात झाली आहे.

संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. ईश्वर गिलाडा सांगतात, की एसएससी उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्विमिंग, सेक्स आणि सायकलिंग याच्या माध्यमातून आपले आरोग्य उत्तम राहू शकते. सायकलिंग केल्याने हाताचा, पायाचा, पोटाचा आणि पर्यायाने संपुर्ण शरीराचा व्यायाम होतो. शरीरातील रक्तपुरवठा सुधारतो. श्वसनक्रिया सुधारुन शुद्ध प्राणवायू मिळण्याचे प्रमाण वाढते. संसगर्जन्य रोगांपासून हृदयविकारापर्यंत अनेक आजारांना पायबंद बसतो.

डॉ. गिलाडा म्हणाले, की काही लोक वेळ नसल्याचे सांगतात. पण सायकलिंग हा व्यायाम आता घरीही करता येतो. स्पिन बाईक चालवताना आपण सोबत इतरही कामे करु शकतो. त्यामुळे व्यायामासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाही. आधी कार, बाईक्स असणाऱ्या देशाला विकसित देश समजले जात असे. पण आता परिमाण बदलले आहेत. नेदरलंड या देशात सर्वाधिक सायकली आहेत. सायकलिंगच्या माध्यमातून या देशातील लोकांनी उत्तम आरोग्य साधले आहे.

सायकल कट्टा

सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल कट्टा सारखे अनेक ग्रुप मुंबई शहरात आहेत. सायकल कट्टाच्या नियमित बैठका होतात. त्यात सायकलिंगचे अनुभव शेअर करण्यासह आरोग्य, पोषण, सायकलिंगच्या तांत्रिक बाजू आदी विषयांवर चर्चा केली जाते. सायकलिंगची आवड असणाऱ्या लोकांचे एक नेटवर्क तयार केले जाते. त्यातून अनेक इव्हेंट आयोजित करण्यासह व्यक्तिमत्व विकासाच्या दिशेने प्रयत्न केला जातो. यासह मुंबई सायडर्स, पेडल बनीज, द हॅपी सायकल शॉप, बाईक शार्क, सायकलिंग फॉर फुडी, बडी रायडर्स, ३६५ होप्स असे अनेक सायकल प्रेमींचे ग्रुप्स आहेत.

नाईट सायकलिंग

मुंबईसारखा गजबजलेल्या शहरात दिवसा सायकलिंग करणे जरा अवघड जाते. त्यामुळे तरुणांमध्ये आता नाईट सायकलिंगचे कल्पना रुजत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर तुलनेने कमी वाहतूक असते. अशा वेळी सायकलिंग करणे सोपे जाते.

हेरिटेज किंवा फूड सायकलिंग

मुंबईत अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. सायकलींगच्या माध्यमातून या स्थळांना भेटी देण्याकडे सायकल प्रेमींचा कल वाढत आहे. याप्रमाणेच विकेंडला शहरातील प्रसिद्ध खाऊगल्ल्यांना भेटी देण्यासाठीही सायकलिंगचा वापर केला जातो.

मुंबईतील डबेवाले

पांढरे शुभ्र कपडे, गांधी टोपी आणि सायकल अशी मुंबईतील डबेवाल्यांची ओळख आहे. सायकलमुळे शहरातील कोणत्याही चिंचोळ्या गल्लीत डबा पोहोचवणे सोपे जाते. तसेच प्रवासाला खर्च येत नाही.

मेट्रोतही सायकल

मुंबई मेट्रोत सायकल ठेवण्यासाठी खास जागा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशाला सायकलसह मेट्रोने प्रवास करता येतो. सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोत सायकलसह प्रवास करणाऱ्या मुलांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अधिक वाचा :

Back to top button