iPhone : फॉक्सकॉन बंगळुरुमध्ये बनवणार वर्षाला २ कोटी आयफोन | पुढारी

iPhone : फॉक्सकॉन बंगळुरुमध्ये बनवणार वर्षाला २ कोटी आयफोन

बंगळुरु; पुढारी वृत्तसेवा : बंगळुरु मधील देवनहल्ली येथे इलेक्ट्रॉनिक उत्पादने निर्माण करणारी फॉक्सकॉन कंपनी पुढील वर्षाच्या एप्रिलपर्यंत आयफोनचे (iPhone) उत्पादन सुरु करेल. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची जगातील सर्वात मोठी करार उत्पादक कंपनी आहे. हा प्रकल्प १३,६०० कोटी रुपयांचा असून त्यातून ५०,००० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. फॉक्सकॉनचे ध्येय तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करणे आणि दरवर्षी २ कोटी आयफोन तयार करणे आहे.

बंगळुरूमधील देवनहल्ली येथील ३०० एकर जमीन या वर्षी १ जुलैपर्यंत फॉक्सकॉनला सुपूर्द केली जाईल. कर्नाटकचे उद्योगमंत्री एम.बी.पाटील म्हणाले की, याशिवाय रस्ते, जोडणी, पाणी व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्थाही सरकार निर्धारित वेळेत पूर्ण करेल. (iPhone)

फॉक्सकॉनच्या प्रतिनिधींची काँग्रेस मंत्र्यांसोबत बैठक (iPhone)

जॉर्ज चू यांच्या नेतृत्वाखाली फॉक्सकॉनच्या प्रतिनिधींनी पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर पाटील यांनी ही घोषणा केली. यावेळी कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे उपस्थित होते.

कर्नाटकात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने सत्ता हाती घेतल्याच्या काही आठवड्यांनंतर ही घोषणा झाली आहे. पाटील म्हणाले की, फॉक्सकॉनला त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी असलेल्या गरजांची माहिती देण्यास सांगितले आहे. कंपनीने कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाला (KIADB) जमिनीच्या किमतीच्या ३० टक्के (रु. ९० कोटी) आधीच दिले आहेत. राज्याच्या उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारने १३,६०० कोटी रुपयांचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात गती दाखवली आहे.

मार्चमध्ये, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घोषणा केली होती की Apple लवकरच बेंगळुरूमध्ये आयफोनचे उत्पादन सुरू करेल, ज्यामुळे सुमारे १ लाख नोकऱ्या निर्माण होतील.

अधिक वाचा :

Back to top button