छोटा राजनला मोठा झटका : Netflixची वेबसेरिज Scoopला स्थगिती नाही; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार | Chhota Rajan web series Scoop
Chhota Rajan web series Scoop : राजनच्या याचिकेवर ७ जूनला सुनावणी

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स (NetFlix)वरील वेबसेरिजच्या प्रक्षेपणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. नेटफ्लिक्सवर स्कूप (Scoop) ही वेबसेरिज सुरू आहे. ही वेबसेरिजला छोटा राजनने आक्षेप घेतला होता. छोटा राजनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या वेबसेरिजच्या प्रक्षेपणास स्थगितीची मागणी केली होती. पण या वेबसेरिजच्या प्रक्षेपणास तातडीने स्थगिती देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Chhota Rajan web series Scoop)
न्यायमूर्ती एस. जी. दिघे म्हणाले, “या वेबसेरिजचे प्रक्षेपण सध्या सुरूच आहे. तसेच यावर तातडीने सुनावणी घ्यावी असे काही दिसत नाही. सेरिजच्या निर्मात्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक तो वेळ दिला पाहिजे.” या याचिकेवर आता ७ जूनला सुनावणी होणार आहे.
या संदर्भातील बातमी Bar & Bench या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
गँगस्टर छोटा राजन सध्या तिहार तुरुंगात आहे. या वेबसेरिजच्या विरोधात त्याने Commercial Courts Act नुसार दावा दाखल केला असून फक्त १ रुपायाची नुकसान भरपाई त्याने मागितली आहे. यावरून या दावा Commercial Courts Actमध्ये कसा काय ग्राह्य मानता येईल, अशी विचारणाही न्यायमूर्तींनी केली आहे. यावर छोटा राजनच्या वकिलांनी याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी मुदत मागितली आहे.
छोटा राजनच्या वतीने वकील मिहिर देसाई बाजू मांडत आहेत.
छोटा राजनाचे म्हणणे काय? Chhota Rajan web series Scoop
“एका खुनामागे माझा हात असल्याचे दाखवले आहे. या प्रकरणात माझ्यावर दोषारोप सिद्ध झाले असले तरी या विरोधात मी अपिल दाखल केले आहे. लाखो लोक ही वेबसेरिज पाहातील, त्यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो,” असे छोटा राजनने याचिकेत म्हटले आहे.
तर नेटफ्लिक्लसच्या वतीने रवी कदम बाजू मांडत आहेत. तर हिरेन कमोद हे निर्माते हन्सल मेहता यांची बाजू मांडत आहेत. या वेबसेरिजचे सर्व सहा भाग प्रक्षेपित झाल्याचे, त्यांनी सांगितले. राजन ज्या गुन्ह्याचा संदर्भ देत आहे, त्याचे निकालपत्र सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध आहे, असे कदम यांनी सांगितले.
काय आहे Scoopचे कथानक?
पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या खून प्रकरणावर ही वेबसेरिज आहे. जून २०११ला डे यांचा दिवसाढवळ्या खून झाला होता. या प्रकरणात छोटा राजनसह ११ आरोपी होते. पत्रकार जिग्ना वोरा हिच्यावरही दोषारोप होते, पण तिची निर्दोष मुक्तता झाली, तर इतरांवरील दोषारोप सिद्ध झाले होते.
हेही वाचा