छोटा राजनचा हस्तक अबू सावंत गजाआड | पुढारी

छोटा राजनचा हस्तक अबू सावंत गजाआड

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याचा अत्यंत जवळचा हस्तक संतोष महादेव सावंत ऊर्फ अबू सावंत याचे भारतात प्रत्यार्पण करून त्याला गजाआड करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. सिंगापूरमधून प्रत्यार्पणानंतर मुंबई विमानतळावर उतरलेल्या सावंत याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एका बिल्डरकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणात अटक केली असून न्यायालयाने त्याला 2 मेपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

मुंबईच्या टिळकनगरात पुनर्विकास बांधकाम प्रकल्प राबवत असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला अबू सावंत याने धमकावून त्याच्याकडून 20 लाखांची खंडणी उकळली होती. सावंत हा या बांधकाम व्यावसायिकाला ठार मारण्याची धमकी देत आणखी 20 लाखांची मागणी करत होता. अखेर बांधकाम व्यावसायिकाने मुंबई पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी डिसेंबर 2005 मध्ये टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

गुन्हेशाखेने तपास करत या प्रकरणात एकूण 11 आरोपींविरोधात आरोपपत्र आणि दोन पुरवणी आरोपपत्रे न्यायालयात दाखल केली. या गुन्ह्यात 2005 पासून अबू सावंत हा फरार होता. 2012 मध्ये त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. पुढे या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. एप्रिल 2016 मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीबीआयने तीन आरोपींविरोधात न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. पुढे अबू सावंत याच्या वतीने न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्यासाठी न्यायालयासमोर अर्ज सादर करण्यात आला.

अबू सावंत हा सिंगापूरमध्ये वास्तव्यास होता. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोपी अबू सावंत याचे प्रत्यार्पण करण्याची विनंती सिंगापूर सरकारला केली होती. तपास यंत्रणांना यात यश आले. अखेर बुधवारी अबू सावंत याचे सिंगापूरवरून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तो मुंबई विमानतळावर उतरताच येथील सुरक्षा यंत्रणेने त्याला ताब्यात घेत सीबीआयकडे सोपविले. सीबीआयने त्याला अटक केली आहे.

Back to top button