

मुंबई : तन्मय शिंदे : Container OPD : शिवडी पूर्व विभागात कोळीवाडा रोडवर तब्बल 40 वर्षांनंतर महापालिकेचा आरोग्य दवाखाना उभारण्यात आला आहे. अत्याधुनिक पद्धतीची यंत्रणा आणि सर्व प्रकारच्या सुविधा असलेला हा दवाखाना जणू शिवडीकरांसाठी वरदान ठरला आहे. दोन महिन्यात तब्बल 8000 रुग्णांनी दवाखान्यात उपचार घेतले आहेत.
शिवडी कोळीवाडा, पूर्वेकडील भागात सुमारे तीन ते साडेतीन हजार लोकवस्ती आहे. मात्र गेल्या 40 वर्षांपासून पालिकेचा दवाखाना आणि आरोग्य केंद्र नव्हते. त्यामुळे तब्बल 2 किलो वर असलेले केईएम रुग्णालय गाठावे लागत होते. तसेच मध्ये असलेल्या रेल्वे पटरीचे गेट ठराविक वेळीच उघडे होत असल्याने अन्य वेळी केईएम रुग्णालय गाठण्यास वळसा घालून जावे लागत होते. ( Container OPD )
शिवडी पूर्व आणि कोळीवाडा परिसरात पालिकेचे आरोग्य केंद्र नव्हते. मात्र लोक तरी मुख्य रुग्णालयात उपचारासाठी जात होते. मात्र कोरोना काळात केईएम सायन सारख्या रुग्णालयात जाण्यास नागरिक घाबरत असल्यामुळे उपचाराअभावी नागरिकांचे खुप हाल झाले. विभागात एखादा चांगला बी.एम.एस.डाॅक्टर नव्हता. त्यामुळे उपचार घ्यायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला. आणि नागरिकांनी शिवडी पूर्व विभागात आरोग्य केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी पडवळ यांच्याकडे केली. आणि त्यांनी दवाखाण्याचा प्रस्ताव मुंबई पालिकेला दिला. त्यानंतर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला. त्यानंतर पालिका अधिकारी वर्ग यांच्यासोबत बैठक झाली. आणि ठिकाणी शिवडी कोळीवाड्यात श्री.बाळासाहेब ठाकरे दवाखाना उभारण्यात आला.
हा दवाखाना चार कंटेनरमध्ये ( Container OPD ) बांधण्यात आला असून तेथे आधुनिक पद्धतीची यंत्रणा आणि सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहे. कंटेनर मध्ये असला तरी संपूर्ण दवाखाना एसी आहे. या दवाखान्यामुळे नागरिकांची आरोग्य सुविधेसाठी दोन किमी केईएम व शिवडी नाका येथील आरोग्य केंद्रात जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबली. या दवाखान्याला दोन महिने झाले असून येथे तब्बल 8000 रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत.
या परिसरात पक्के बांधकाम असलेला दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी इंदिरा नगर परिसरात बीपीटीच्या एका इमारतीत जागा शोधण्यात आली होती. बीपीटीने दर महिना 80 हजार रुपये भाड्याने जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र या जागेची दुरवस्था झाली होती, तसेच तिच्या डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित होता. हा खर्च वाचवण्यासाठी कंटेनर दवाखान्याचा पर्याय निवडण्यात आला, अशी माहिती सचिन पडवळ यांनी दिली.
4 एसी कंटेनर असलेला दवाखाना
एम.बी.बी.एस. डॉक्टर
कंपाऊंडर आरोग्य सेविका इतर कर्मचारी
मनपा शेड्युल वर असलेली मोफत औषधे
ओ.पी.डी. व रक्ततपासणी
मोफत समुपदेशन
लहान मुलांचे लसीकरण (0 ते 5 वय)
गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना रुग्णालयात नेण्यास पूर्वी अक्षरशः सोबत असलेल्या नातेवाईकाची दमछाक होत होती. मात्र यामुळे सर्वांना जागेवर उपचार मिळू लागले आहेत. या दवाखान्यात रोज 100 रुग्ण उपचार घेत असून शिवडी कोळीवाड्यातील आरोग्य समस्या सुटण्यास मदत झाली आहे.