पैठण क्राईम : दरोडेखोरांचा २ महिलांवर बलात्‍कार; दहशतीने कुटुंबाची जागुन रात्र - पुढारी

पैठण क्राईम : दरोडेखोरांचा २ महिलांवर बलात्‍कार; दहशतीने कुटुंबाची जागुन रात्र

पैठण ; पुढारी वृत्तसेवा :

पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तोंडोळी परिसरात अज्ञात दरोडेखोरांनी (मंगळवार) मध्यरात्री धुमाकूळ घातला. यावेळी वाड्या वस्तीवर राहणाऱ्या परप्रांतीय शेतमजुराला घरामध्ये बांधून २ महिलांवर बलात्‍कार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी वाड्या वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी नागरिकांनी व पीडित कुटुंबाने दरोडेखोरांच्या दहशतीमुळे बुधवारची रात्र अक्षरशा जागून काढली. त्यामुळे पंचक्रोशीतील तरुणांनी एकत्र येऊन “जागते रहो ” हा नारा रात्रभर वाड्या वस्तीवर फिरून दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे आमदार तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे यांनी आज (गुरुवार) सकाळी अकरा वाजता घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली.

यावेळी पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी डॉ स्वप्नील मोरे व पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ विशाल नेहुल यांची उपस्थिती होती. यावेळी भुमरे यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना दरोडेखोर शोधण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याच्या सूचना दिल्‍या. तसेच या परिसरात दरोडेखोरांमुळे दहशतीत असलेल्या वाड्या वस्तीवरील नागरिकांना विशेष बंदोबस्तासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी नामदेव खरात, गणेश मडके, बाबासाहेब टेके, ओमप्रकाश जयस्वाल यांच्यासह तोंडोळी परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button