काँग्रेस अध्यक्ष निवड ‘या’ महिन्यात; राहुल गांधींना साकडे | पुढारी

काँग्रेस अध्यक्ष निवड ‘या’ महिन्यात; राहुल गांधींना साकडे

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

काँग्रेस अध्यक्षपदासाठी कार्यकारी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा राहुल गांधी यांना नेत्यांनी साकडे घातले आहे. मात्र, सप्टेंबर २०२२ पर्यंत अध्यक्ष निवड होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंजाब, कर्नाटकसह अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अध्यक्ष निवड होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी काँग्रेस मुख्यालयात कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी स्वपक्षातील बंडखोर नेत्यांना खडेबोल सुनावले तसेच भाजपवर जोरदार टीका केली.

मी अजूनही हंगामी अध्यक्ष आहे. जर आपसातील मतभेद विसरले नाहीत तर आपल्याला विधानसभा निवडणुका जिंकता येणार नाहीत. माध्यमांमधून माझ्याशी बोलू नका, असे त्‍यांनी पक्षातील नेत्‍यांना खडसावले.  तसेच लखीमपूरची घटना भाजपची मानसिकता दाखवते, असे म्हणत भाजपवर जोरदार टीका केली.

या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अन्य नेत्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदाची सूत्रे हातात घ्यावीत, अशी विनंती केली. मात्र, सध्या सर्व नेत्यांनी एकजुटीने सामोरे जावे. अध्यक्ष निवड पुढील वर्षीच होईल, असे सांगण्यात आले.

गुलाम नबी आझाद नरमले

सोनिया गांधी यांनी ‘जी २३’ नेत्यांना खडेबोल सुनावल्यानंतर ते काहीसे नरमले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझा सोनिया गांधीवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या नेतृत्वावर कुठलेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. याआधी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी पत्र लिहून सोनिया गांधी यांना कार्यकारी समितीची बैठक बोलविण्याची विनंती केली होती. तसेच पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्ष निवड झाली पाहिजे, अशीही मागणी केली होती. कपिल सिब्बल यांनी पंजाब काँग्रेसमधील नेतृत्वबदलानंतर नाराजी व्यक्त करत पक्षाला अध्यक्ष नाही तरीही कोण निर्णय घेते मला माहीत नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

सोनियांचा भाजपवर हल्ला

या बैठकीत सोनिया गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. लखीमपूर खिरीची घटना भाजपची मानसिकता दाखवते. ते शेतकरी आंदोलनाकडे कशा पद्धतीने पाहते हे लक्षात येते. तीन काळे कृषी कायद्याविरोधात सरकारविरोधात शेतकरी संघर्ष करत असताना सरकारला त्याची चिंता नाही. जम्मू आणि काश्मिर दोन वर्षे केंद्रशासित राहिला आहे. तरीही येथे दहशतवादी कारवाया होत आहेत. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. परदेश धोरण हे निवडणुकीचा अजेंडा आणि ध्रुवीकरणाचे हत्यार बनत आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

पाच नेते अनुपस्थित

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आजारी असल्याने एम्समध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि अन्य चार नेते या बैठकीवेळी अनुपस्थित होते.

हेही वाचलं का ?  

Back to top button