महाविकास आघाडी म्हणजे दहातोंडी रावण: भाजपचे प्रत्युत्तर | पुढारी

महाविकास आघाडी म्हणजे दहातोंडी रावण: भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई, पुढारी ऑनलाईन:

शिवसेनाचा मुख्यमंत्री झाल्याने भाजपची अवस्था कळपात वाघ शिरलेल्या मेंढरासारखी झाली आहे, अशी टीका केल्यानंतर महाविकास आघाडीची तुलना दहातोंडी रावणाशी केली आहे ( महाविकास आघाडी दहातोंडी रावण ). ऐन विजयादशमीला जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ‘स्वत:ला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून शेळी कधी बनले आहेत. त्यांनाही कळालं नाही. बरं झालं, महाविकास आघाडीत सामील झाल्यानं हिंदुत्वाचा बुरखा फाटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, हे वारंवार दाखवून दिले आहे.’

तसेच देशात लिहिण्याचं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य उरलंय का? असा म्हणता, ते स्वातंत्र्य आहे म्हणूनच तुम्ही अग्रलेख लिहिताय. तुमच्या सरकारविरोधात बोलणाऱ्यांना मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण केली जाते. ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होत नाही म्हणून रिक्षाचालकांना मारहाण, दुकानदारांना शिवीगाळ केली जाते. महाविकास आघाडीच्या दहा तोंडी ‘रावणाचा’ अहंकार ही महाराष्ट्रातील जनताच मोडेल, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी दहातोंडी रावण : काय म्हटले शिवसेनेने

शिवसेना सत्तेत आल्यापसून राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कीव करावीशी वाटते. विचारांचे सोने लुटा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका, असे त्यांना सांगण्याचीच सोय नाही. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र आता काढावीच लागतील.

महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्र सदैव उधळत राहिला. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे, पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे.

Back to top button