लाऊड म्युझिक मुळे डास जातात पळून? | पुढारी

लाऊड म्युझिक मुळे डास जातात पळून?

न्यूयॉर्क : डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका यासारख्या अनेक आजारांचा फैलाव होत असतो. अमेरिकन ‘जर्नल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीन’मधील माहितीनुसार डेंग्यू सीरोटाईप-2 अधिक घातक ठरू शकतो. अशावेळी डासांपासून बचाव करणे गरजेचे ठरते. त्यासाठी जगभरात अनेक उपाय केले जातात. आता वैज्ञानिकांनी म्हटले आहे की डासांना हाय फ्रिक्‍वेन्सी आवाज पसंत नसतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्मधून येणार्‍या लाऊड म्युझिक म्हणजेच मोठ्या आवाजातील संगीतामुळे डास आपली संख्याही वाढवू शकत नाहीत आणि माणसाला दंशही करू शकत नाहीत.

डासांना पळवून लावण्यासाठी हा एक मार्ग ठरू शकतो. लाऊड म्युझिक मुळे खरे तर ध्वनिप्रदूषण होते आणि आरोग्याच्याही अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे डासांना पळवून लावण्यासाठी मोठ्या आवाजात संगीताचा दणदणाट करणे हा काही योग्य उपाय नाही.

मात्र, एक नवे संशोधन याद‍ृष्टीने याकडे पाहिले जात आहे. सध्या डासांचा नायनाट करण्यासाठी अनेक रसायनेही कुचकामी ठरत असल्याने वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. अगदी स्मार्टफोनही यासाठी मदत करू शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

त्यासाठी काही अ‍ॅप्स डाऊनलोड करणे गरजेचे असते. गुगल प्ले स्टोअरमध्ये अनेक अँटिमास्किटो रिपलेंट अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. डासांना या अ‍ॅप्समधील हाय फ्रिक्‍वेन्सीचा आवाज पसंत नाही. त्यामुळे ते अशा आवाजाच्या ठिकाणी फिरकत नाहीत. या अ‍ॅप्सना ऑन केल्यावर 17 ते 22 किलो हर्टझ्च्या लहरी निघतात. त्या डास आणि माशांना पिटाळून लावतात.

Back to top button