Maharashtra Bandh : 'बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मुर्ख' | पुढारी

Maharashtra Bandh : 'बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मुर्ख'

पुढारी ऑनलाईन डेस्क

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. पण महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपने जाहीर विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. हा बंद राजकीय नसून शेतकऱ्यांसाठी आहे. हा बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मुर्ख आहेत, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

बंद चांगला आहे. तो १०० टक्के यशस्वी होईल. तिन्हीही पक्ष ताकदीने, सक्रियपणे बंदमध्ये सहभागी आहेत. संपूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात उभा राहिला आहे. देशाचा शेतकरी महाराष्ट्र बंदकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवले नाही तर तुम्ही खाणार काय? असा सवाल करत त्यांनी बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांना केला आहे.

शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद ((Maharashtra Bandh) पुकारणार नसाल तर जय जवान, जय किसान या घोषणेला काहीच अर्थ नाही. बंद यशस्वी होईल. बंद अयशस्वी करुन दाखवाच, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे. बंद दरम्यान किरकोळ घडतच असतात, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुंबईत महाराष्ट्र बंदचा बेस्टवर परिणाम झाला आहे. शहरातील विविध ठिकाणी ९ बस फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापुरात महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी महामार्ग रोखून धरला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात युवासेना आक्रमक झालेली दिसून आली. येथे रस्त्यावर टायर जाळत महाराष्ट्र बंदला सुरुवात करण्यात आली. तसेच शेतकरी जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी महामार्ग रोखला

Back to top button