मुबई एनसीबीने क्रूझवर छापा टाकल्यानंतर नेमके किती लोकांना पकडले आणि किती लोकांना सोडले याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी नबाब मलिक यांनी एनसीबी कडे केली आहे. एनसीबीने हिंमत असेल तर त्यांच्याकडील फुटेज जाहीर केले पाहिजे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे.
क्रूझ पार्टीवर टाकलेली धाड बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मेहुण्याला सोडून दिल्याच्या आरोपानंतर एनसीबीने खुलासा केला होता.
मलिक म्हणाले, 'मी म्हणालो होतो ११ जणांना एनसीबीने अटक केली होती. त्यापैकी तिघांना सोडून दिले. मात्र, एससीबी म्हणते की, ११ नाही, १४ लोकांना अटक केली. आम्ही सगळे फुटेज पाहिले. तीन लोक सोडल्यानंतर हे फुटेज आम्ही सर्वांसमोर आणले आहे. मी एनसीबीला आव्हान देत आहे, जर १४ लोकांना अटक केली तर आणखी तीन लोक कोण होते हे तुम्ही जाहीर करावे.
तुम्ही कारवाईचे फुटेज जाहीर करावे. भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर तीन लोकांना तुम्ही सोडून दिले. ही सगळी कारवाई बनावट आहे. एनसीबीचे दिल्लीतील अधिकारी सांगत होते की आम्ही जागेवर पंचनामा करतो. मात्र, त्यांना एक विचारू इच्छितो की त्या दिवशी रात्री साडेआठ वाजता तुम्ही माध्यमांना काही फोटो पाठविले त्यात एक व्हिडिओही आहे. ते फोटो समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहेत. ती कारवाई क्रूजवर झालेली नाही.
मी भाजपच्या नेत्यांचे नाव घेतल्यामुळे मला काहीजण १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्याची नोटीस पाठविणार आहेत. त्याची मी वाट पाहत आहे. भाजपने माझी ब्रँड व्हॅल्यू १०० कोटी ठरवली, त्यामुळे मला आनंद झाला. मोहित कंबोज काल मला म्हणाले 'नवाब मलिक भंगारवाला आहे.' मला अभिमान आहे. माझे वडील आणि मी भंगारचा व्यवसाय करत होतो. कायदेशीर व्यवसाय केल्याचा मला अभिमान आहे.'