महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यास व इतर दोन अधिकार्यांना अश्लिल शिवीगाळ झालेल्या कथीत ऑडिओ क्लीपची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या अनुषंगाणे बंडगार्डन पोलिसांनी पीडित महिला अधिकार्याचा जबाब नुकताच नोंदविला. टप्प्या टप्प्याने या प्रकरणाशी संबंधित असणार्या इतरांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Bjp Mla Sunil Kamble)
महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील रखडलेले बील काढण्यावरून भाजप आमदार व नगरसेवक सुनील कांबळे हे महिला अभियंत्यास व इतर दोन वरीष्ठ अधिकार्यांना अश्लिल शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप मागील पंधरवाड्यात व्हायरल झाली होती.
ज्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन आला होता, तो व्यक्ती आ. कांबळे बोलत आहेत, असे म्हणत असल्याचा स्पष्ट उल्लेख क्लीपमध्ये होता.
ही ऑडिओ क्लिप वाऱ्यासारखी शहरात व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कांबळे यांच्या घरासमोर आंदोलन केले.
त्यानंतर इतर राजकीय पक्षांनीही कांबळे यांच्या विरोधात महापालिकेत आंदोलन केले.
या प्रकरणावरून आ. कांबळे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा खुलासा करत क्लिपची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
पीडित महिला अधिकार्याचा नुकताच बंडगार्डन पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला.
यानंतर टप्प्या टप्प्याने क्लिपमध्ये उल्लेख असलेले इतर दोन अधिकारी, ज्याच्या मोबाईलवर फोन आला होता तो व्यक्ती, ज्याच्या मोबाईलवरून फोन आला होता. तो व्यक्तीसह आ. कांबळे यांचाही जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
बंडगार्डन आणि डेक्कन ही दोन शहरातील चॉईस पोलिस स्टेशन असल्याने इतर पोलिस ठाण्यामध्ये नोंद झालेल्या प्रकरणांचे जबाब या दोन ठिकाणी नोंदवता येतात.
त्यामुळे पिडीत महिला अधिकार्याने बंडगार्डनला जबाब दिल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.