कोल्हापूरच्या वृद्धेचा साताऱ्यात शॉक लागून मृत्यू, जावई गंभीर जखमी | पुढारी

कोल्हापूरच्या वृद्धेचा साताऱ्यात शॉक लागून मृत्यू, जावई गंभीर जखमी

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

जावळी तालुक्यातील हुमगाव येथील ८२ वर्षीय वृद्ध महिला यशोदाबाई दशरथराव कदम ह्या घरामागील परड्यामध्ये गेल्या होत्या. दरम्यान विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेवर पाय पडल्याने वद्धेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १०) सकाळी ८ च्या सुमारास घडली. तसेच वृद्धेला वाचवणारे तिचे जावई प्रवीण दत्तात्रय धुमाळ (वय ६०) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

शॉक लागून मृत्यू :तुटलेली तार हातात घेतली अन्…

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वृद्ध महिला यशोदाबाई दशरथ कदम (मुळ रा. कोल्हापूर) या आपल्या लेकीच्या घरी गेल्या दोन महिन्यापासून वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे घरामागील परड्यामध्ये त्या गेल्या असता लगत असणाऱ्या विजेच्या पोलवरून तुटलेली तार पायाखाली आली. त्यांनी ती उचलली मात्र त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा धक्का बसला.

त्या जागीच खाली कोसळल्या घरा पाठीमागील परड्यामध्ये ओरडण्याचा मोठा आवाज झाल्याने घरात असणारे त्यांचे जावई प्रवीण दत्तात्रय धुमाळ हे बाहेर आले. कदम यांना वाचवण्यासाठी ते पुढे आले त्यांनादेखील विजेचा जोरदार झटका बसला. ते गंभीररीत्या जखमी झाले व बेशुद्ध पडले घराच्या अवतीभोवती असणाऱ्या नागरिक घटनास्थळावर पोहोचल्यानंतर वृद्ध कदम व धुमाळ हे जमिनीवर कोसळलेले दिसले.

विज वितरण मंडळाचे अधिकारी फिरकलेच नाहीत…

नागरिकांनी तात्काळ विद्युत प्रवाह बंद केला. जखमी धुमाळ यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. दरम्यान कदम यांचा जागीच मृत्यु झाला. यासंदर्भात वीज वितरण मंडळाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

खुमगाव परिसरात असणाऱ्या या वीज वितरण मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

घटनेची माहिती वीज वितरण मंडळाला दिली असून देखील घटनास्थळावर दोन तास वीज वितरण मंडळाचा एकही अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही.

Back to top button