‘प्रेमात दुरावा आला म्‍हणून बलात्‍काराचा आरोप ठेवता येणार नाही’ : मुंबई उच्‍च न्‍यायालय | पुढारी

'प्रेमात दुरावा आला म्‍हणून बलात्‍काराचा आरोप ठेवता येणार नाही' : मुंबई उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रेमात दुरावा आला याचा अर्थ लैंगिक संबंधांना तिची संमती नव्‍हती, असे म्‍हणता येणार नाही. अशा वेळी संशयितावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्‍च न्‍यायालयाने बलात्‍कार प्रकरणातील संशयितास दोषमुक्‍त केले.

काय होते प्रकरण ?

मुंबईतील एका तरुणीचे २०१३ मध्‍ये तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. सलग आठ वर्ष दोघेही नातेसंबंधात होते. या काळात त्‍यांच्‍यात शारीरिक संबंधही निर्माण झाले. आठ वर्षांच्‍या प्रदीर्घ काळानंतर दोघांच्‍या नात्‍यात दुरावा निर्माण झाला. लग्‍नाचे आमिष दाखवून संबंधित तरुणाने विविध ठिकाणी नेवून जबरदस्‍तीने शारीरिक संबंध ठेवले. नात्‍यात दुरावा आल्‍यानंतर तरुणाने तिला अश्‍लील मेसेज पाठवले तसेच तिच्‍या चारित्र्यावरही संशय घेतला, अशी तक्रार फिर्याद तरुणीने दिली होती. त्‍यानुसार संशयितावर भारतीय दंड संहितेच्या ( आयपीसी ) कलम ३७६ (बलात्कार) आणि ३२३ ( दुखापत करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. या कारवाईविरोधात संशयिताने उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती.

दोन प्रौढ व्‍यक्‍ती नाते निर्माण करतात तेव्‍हा केवळ एकाला दोष देता येणार नाही

या प्रकरणाती तक्रारदार आणि संशयित आरोप हे आठ वर्ष नातेसंबंधात होते. यानंतर त्‍यांच्‍या नात्‍यात दुरावा निर्माण झाला. जेव्‍हा दोन प्रौढ व्‍यक्‍ती नाते निर्माण करतात तेव्‍हा केवळ एकाला दोष देता येणार नाही. कारण जेव्‍हा तरुण-तरुणीमध्‍ये शारीरिक संबंध प्रस्‍थापित झाले तेव्‍हा लग्‍नाचे वचन दिले गेले, असे कोणतेही संकेत नाहीत. तक्रारदार महिला ही शारीरिक व मानसिक अशा दोन्‍ही नातेसंबंधाचे स्‍वरुप समजून घेण्‍याएवढी पुरेशी परिपक्‍क वयाची आहे. या प्रकरणात केवळ नातेसंबंध तुटल्‍यामुळे लैंगिक संबंधांना तिची संमती नव्‍हती, असे म्‍हणता येणार नाही. जेव्‍हा प्रौढ स्‍त्री आणि पुरुषांमधील प्रेमात दुरावा निर्माण होतो. प्रेमाचे रुपांतर विवाहात होत नाही, अशा वेळी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही, असे एक सदस्‍यीय खंडपीठाच्‍या न्‍यायमूर्ती भारती डोंगरेयांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button