Bihar News : हिंसाचारानंतर नालंदात पुढील आदेशापर्यंत इंटरनेट बंद; कलम 144 लागू | पुढारी

Bihar News : हिंसाचारानंतर नालंदात पुढील आदेशापर्यंत इंटरनेट बंद; कलम 144 लागू

पुढारी ऑनलाइन डेस्क : रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर बिहारमध्ये Bihar News सातत्याने परिस्थिती कठीण होत आहे. नालंदामध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले. तसेच पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट, शाळा आणि महाविद्यालये देखील बंद राहणार आहेत.

रामनवमीच्या वेळी बिहारच्या ससाराम आणि नालंदा तसेच अन्य शहरांमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात लहान मुले, स्त्रिया तसेच सर्वसामान्यांमध्ये मोठी दहशत पसरली होती. त्यानंतर ससाराम येथे तातडीने कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली होती.

नालंदा येथे देखील परिस्थिती फारसी वेगळी नव्हती. नालंदामध्ये हिंसाचारा दरम्यान मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. यादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. एकूण परिस्थितीवर पोलिसांनी तातडीने नियंत्रण आणण्यासाठी कलम 144 लागू केले. यामध्ये 130 जणांना अटक करण्यात आली. तर 15 लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला, अशी माहिती नालंदा जिल्ह्याचे डीएम शशांक शुभंकर यांनी सोमवारी दिली. तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांनाच मर्यादित वेळेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत परिस्थिती सामान्य होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, नालंदा येथे आज बुधवारी देखील कलम 144 लागू आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत कलम शाळा महाविद्यालये, इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

बिहारच्या सासाराम (जि. रोहतास) येथे रामनवमी दिवशी घडलेल्या हिंसाचारानंतर शनिवारी (दि.2) बॉम्बस्फोटाची घटना घडली. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले तर एकजणाचा मृत्यू झाला आहे. जखमींवर बीएचयू रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे, अशी माहिती सासारामचे डीएम धर्मेंद्र कुमार यांनी दिली आहे.

बिहारमधील सासाराम आणि बिहार शरीफ येथे गुरुवारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ८ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला जाणार असल्याची माहिती  बिहारशरीफ, नालंदाचे एसपी अशोक मिश्रा यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

नाशिक : गोहत्या थांबवा, जिओ और जिने दो ; भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा

IPL 2023 : अक्षर पटेलला गोलंदाजी का दिली नाही? डेव्हिड वॉर्नरने सांगितली खास ‘रणनीती’

Back to top button