राजेश टोपे : प्रतिदिन १५ लाख लसीकरणाचं उद्दिष्‍ट - पुढारी

राजेश टोपे : प्रतिदिन १५ लाख लसीकरणाचं उद्दिष्‍ट

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक व्यक्‍तीचे लसीकरण होणे गरजेचे आहे. आतापर्यंत राज्‍यातील ६२ टक्‍के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. १०० टक्‍के नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी सुक्ष्म नियोजन केलं असल्‍याचे सांगत राज्‍याचे आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यांनी यावेळी मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा केली. आज नवरात्रौत्‍सवाचा पहिला दिवस आहे. राज्‍यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. असे जरी असले तरी नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर नियमावलींचे पालन करणे आवश्यक असल्‍याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्‍यान, यावेळी टोपे यांनी मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा केली. राज्‍य सरकारकडून कोरोना लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन केलं जात आहे. कोरोना रूग्‍णांचे मृत्‍यू प्रमाण कमी करत ते थांबविण्यासाठी आमचे प्रयत्‍न सुरू आहेत.

यासाठी लसीकरणाचे महत्‍व या विषयी जनजागृतीला प्राध्यान्य देण्यात येत आहे. यासोबतच स्‍वयंसेवी संस्‍था आणि प्रभावी व्यक्तिमत्वांचा याकामी मदत घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सध्या राज्‍याकडे १ कोटी लसींचा साठा आहे. दररोज १५ लाख लसी देण्याचे उदिष्ट्य आरोग्‍य विभागाला देण्यात आले आहे.

यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. लसीकरणासाठी ग्राम पंचायत आणि प्रभागनिहाय सूक्ष्म नियोजन केलं असल्‍याचे टोपे म्‍हणाले.

पहा व्हिडिओ : नवरात्रीत या देखण्या अलंकारांनी सजते आई अंबाबाई

Back to top button