दहशतवाद येतोय चेहरा बदलून | पुढारी

दहशतवाद येतोय चेहरा बदलून

- सुशांत सरीन, सामरिक विश्लेषक

दहशतवादाचे ( दहशतवाद ) स्वरूप बदलले आहे. दहशतवादी ड्रोनसारखी उपकरणे सर्रास वापरू लागले आहेत. नव्या पद्धती वापरून हल्ले होण्याआधीच भारताने त्यापासून बचावाची यंत्रणा उभारली पाहिजे.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात छापे टाकून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांना पकडले. सणासुदीच्या दिवसांत देशात अशांततेचे वातावरण तयार करण्याचा त्यांचा कट होता, असा दावा आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर जी शक्यता व्यक्त करण्यात येत होती, त्यालाही या अटकसत्रामुळे पुष्टी मिळाली. काबूलमध्ये सत्तांतर झाल्यानंतर संपूर्ण क्षेत्रात दहशतवाद वाढेल आणि दहशतवाद्यांना अधिक पाठबळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादापुढे अमेरिकेसारखी बलाढ्य शक्ती आणि मित्रराष्ट्रांच्या फौजांनी नांगी टाकल्यामुळे एक प्रकारे पाकिस्तानचाच विजय झाला असून, तोही असा आहे की, पराभव होऊनसुद्धा अमेरिकेचे पाकिस्तानविषयक धोरण नरमाईचेच आहे. त्यामुळे पाकिस्तानपोषित दहशतवाद्यांचा भारताविरुद्ध अधिक वापर केला जाईल, असा कयास आहे. अटकसत्रानंतर ही शक्यता खरी होताना दिसत आहे.

आपल्या सुरक्षा यंत्रणा तत्पर आहेत आणि देशविरोधी षड्यंत्रांचा तातडीने पर्दाफाश करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, वास्तव असे आहे की, हल्ला करण्यात दहशतवाद्यांना एकदा जरी यश आले, तरी संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाईल. गेल्या काही दिवसांपासून असे प्रयत्न होतही आहेत.

पकडलेल्या दहशतवाद्यांविषयी असे सांगितले गेले आहे की, दाऊद इब्राहीमच्या भावाबरोबर या दहशतवाद्यांचे संबंध आहेत आणि ‘डी-कंपनी’च्या नेटवर्कचा वापर केला जात होता. आयएसआयच्या मदतीशिवाय हे दहशतवादी एवढे दुःसाहस खरोखर करू शकतात का? अफगाणिस्तानात सत्ताबदल होताच छोटे-मोठे सर्व दहशतवादी अफगाणिस्तानकडे रवाना झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे पाठबळ असल्यामुळे भारतात घडणार्‍या कोणत्याही दहशतवादी घटनेत ‘नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स’ म्हणजेच देशविरहित शक्ती सहभागी असल्याच्या कोणत्याही दाव्यावर आपण विश्वास ठेवता कामा नये, उलट पाकिस्तानचे सरकार आणि तेथील गुप्तचर संघटनांना थेट जबाबदार धरले पाहिजे.

दहशतवादाचे स्वरूप बदलले आहे. किंबहुना, आपल्या गुप्तचर संस्थांनी हे मान्य केलेच आहे. नवे तंत्रज्ञान आणि पद्धती वापरल्यामुळे दहशतवाद अधिक भयावह बनला आहे. दहशतवादी ड्रोनसारखी उपकरणे सर्रास वापरू लागले आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक देशांवर त्यांनी हल्ले केले आहेत. भारतही यापासून दूर राहू शकत नाही. भारताला असलेला प्रमुख धोका असा आहे की, आपण आत्मघातकी पथके तयार करीत असल्याचे तालिबानने उघडपणे स्वीकारले आहे. त्यामुळे आज ना उद्या आपल्यावर असे हल्ले होणार, हे स्पष्ट आहे. अशा प्रकारे नव्या पद्धती आणि तंत्रज्ञान वापरून दहशतवाद्यांनी हल्ले करण्याआधीच भारताने त्यापासून बचावाची यंत्रणा उभारली पाहिजे. बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस उन्नत होत चालले असून, त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. काश्मीर खोर्‍यात जी सुरक्षा व्यवस्था आहे ती 1990 च्या दशकाच्या तुलनेत खूपच चांगली आहे. परंतु, केवळ तेवढ्यावर थांबता येणार नाही. नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानाधारित हल्ल्यांपासूनही त्यांना सुरक्षा कवच दिले पाहिजे.

नव्या धोक्यांपासून बचावासाठी देशात नवीन तंत्रज्ञानाचा शोध, नवीन प्रकारचे प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञानावर विश्वास आणि गुंतवणूक केली जाणे आवश्यक आहे. धोका निर्माण झाल्यानंतर त्याचा मुकाबला करण्याऐवजी तो येण्यापूर्वीच रोखण्याची व्यवस्था करणे आणि वेळेत तो नष्ट करणे कधीही चांगले. एक मोठा धोका दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्सकडूनही आहे. या धोक्यापासून बचावासाठी आपल्याला आपले डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजेत. कोणतीही गोष्ट नेहमीपेक्षा थोडी जरी वेगळी दिसली, तरी सावध होण्याचे प्रशिक्षण पोलिस आणि गुप्तचर दलांना दिले गेले पाहिजे. याकामी अनेक सामान्य लोकांची मदत घेता येणे शक्य आहे. त्यांना या कामाशी जास्तीत जास्त संख्येने जोडले पाहिजे. अगदीच नव्या प्रकारच्या दहशतवादाचे साक्षीदार आपल्याला व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला खूप तयारी केली पाहिजे. आपल्या सुरक्षा यंत्रणेत अजिबात दोष असता कामा नयेत. याच दिशेने आपल्याकडील सुरक्षा यंत्रणांनी काम करणे यापुढे अपेक्षित आहे.

Back to top button