कस्तुरी : उंच शिखरांना गवसणी घालणारी कोल्हापूरची कस्तुरी - पुढारी

कस्तुरी : उंच शिखरांना गवसणी घालणारी कोल्हापूरची कस्तुरी

कोल्हापूर : सागर यादव

फॅशनच्या दुनियेचे आकर्षण असणार्‍या आजच्या आधुनिक मुलींच्या आवडी-निवडींपासून दूर आपली वेगळी ओळख कस्तुरी दीपक सावेकर या कोल्हापूरच्या कन्येने निर्माण केली आहे. लहान वयापासूनच अत्यंत खडतर अशा गिर्यारोहण क्षेत्रात कस्तुरी ने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली असून, कस्तुरी ने सह्याद्रीसह हिमालयातील उंच शिखरे पादाक्रांत केली आहेत. कस्तुरी

वयाच्या अवघ्या तिसर्‍या वर्षी कस्तुरीने गिर्यारोहणास सुरुवात केली. सह्याद्री पर्वताच्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या कस्तुरीने हिमालयातील उंच शिखरांवरही आपली यशस्वी वाटचाल कायम ठेवली. आतापर्यंत तिने सुमारे 150 हून अधिक मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत.

जगातील सर्वात उंच पर्वत असणार्‍या 29 हजार 29 फूट उंचीच्या माऊंट एव्हरेस्टवरील तिची चढाई थोडक्यात राहिली. शेवटच्या टप्प्यातून खराब हवामानामुळे तिला माघार घ्यावी लागली.

मात्र, या अपयशाने खचून न जाता एव्हरेस्ट शिशखर पुन्हा नव्याने सर करण्याचा निर्धार तिने नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला केला आहे. माऊंट मनस्लू शिखर हे अष्टहजारी शिखर सर करून कस्तुरी बुधवारी कोल्हापुरात परतली.

करवीर हायकर्सच्या माध्यमातून कस्तुरीने गिर्यारोहण क्षेत्रात आपली वाटचाल सुरू ठेवली असून, यासाठी तिला वडील दीपक सावेकर व आई मनस्विनी सावेकर यांच्यासह कुटूंबीयांचे पाठबळ आणि प्रशिक्षक व ज्येष्ठ गिर्यारोहकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

सह्याद्रीतील कामगिरी

2012 – अलंग, मदन, कुलंग किल्ले
2013- रतनगड, सांधन व्हॅली.
2014 – हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने,
2015 – कळसुबाई शिखर, साल्हेर-सालोटा, मुल्हेरमोरा हरगड किल्ले,
2018 – लिंगाणा किल्ला, उंची 3000 फूट, ढाकचा भैरी, कळकराय सुळका,
सह्याद्रीतील एकूण 157 ट्रेक्स, जंगल ट्रेक, घाटवाटा, सुळके सर केले आहेत.

हिमालयातील कामगिरी…

2017 – माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट तर्फे अ‍ॅडव्हेंचर कोर्समध्ये तीन सुवर्णपदके

2017 – हिमालयातील संदकफू पीक समीट केले (उंची 11,929 फूट)

2018 – भारत सरकार रक्षा मंत्रालयातर्फे ‘रक्षा सचिव’ प्रमाणपत्राने गौरव

2018 – मनाली येथे बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स ‘ए’ ग्रेडसह पूर्ण

2018 – क्षितिधार पीकचा बेसकॅम्प ट्रेक केला. उंची 15,700 फूट

2019 – माऊंट मेरा पीक उंची 21,246 फूट समीट केले

2019 – अ‍ॅडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्स अ ग्रेडसह पूर्ण केला

2019 – बी. सी. रॉय पीक उंची 18,000 फूट समीट केले

2021 – आयलँड पीक समीट केले

2021 – खराब हवामानामुळे एव्हरेस्ट मोहीम चौथ्या टप्प्यातून माघार

2021- मनस्लू शिखर (उंची 26,781 फूट) समीट

Back to top button