विधानसभेत टीका करण्यापेक्षा भ्रष्टाचाराचा हिशोब द्या : संजय राऊतांचे दादा भूसेंना प्रत्युत्तर | पुढारी

विधानसभेत टीका करण्यापेक्षा भ्रष्टाचाराचा हिशोब द्या : संजय राऊतांचे दादा भूसेंना प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंत्री दादा भूसे यांनी विधानसभेत माझ्यावर टीका करण्यापेक्षा भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावा. कोट्यवधी रूपये गोळा केले त्याच काय झाल? याच त्यांनी उत्तर द्यावे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मंत्री दादा भुसे यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

खासदार राऊत म्हणाले की, “दादा भूसे यांच्याशी माझे व्यक्तिगत भांडण नाही. ते पक्षाशी बेईमानी करून दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्री झाले. सरकारमधील आमदार, मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आणण्याचे प्रयत्न करत आहोत. भाजपची लोकही विरोधकांची खोटी प्रकरणे काढून ईडी, सीबीआय मागे लावत आहेत. तुमच्या कोट्यवधी रूपयांच्या प्रकरणांविषयी लोकांच्या मनात शंका आहे, त्याच्याविषयी बोला. कोट्यवधी रूपये गोळा केले त्याच काय झाल उत्तर द्या. ही माझी मागणी नाही तर हे शेतकरी म्हणत आहेत. शेतकरी माझ्या पक्षाचे नाहीत. त्यांना कोणताही पक्ष, जात, धर्म नसतो. लोकांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही विधानसभेत उभे राहून आमच्यावर टीका करणार, करा पण भ्रष्टाचाराच उत्तर द्या,” असे राऊत यांनी म्हटले आहे.

दादा भूसेंवर संजय राऊतांचा आरोप काय?

संजय राऊत सोमवारी ट्वीट करत म्हणाले की, “हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने त्यांनी १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले,” असा आरोप त्यांनी केला. यावर विधानसभेत स्पष्टीकरण देताना दादा भूसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा : 

 

Back to top button