मुंबई : दादरचा बाजार इको फ्रेंडली गुढ्यांनी फुलला  | पुढारी

मुंबई : दादरचा बाजार इको फ्रेंडली गुढ्यांनी फुलला 

धारावी; पुढारी वृत्तसेवा : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढी पाडव्यासाठी दादरचा बाजार सज्ज झाला असून, तो विविध आकर्षक रंगाच्या साखरमाळ व पोर्टेबल गुढ्यांनी सजला आहे. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. मात्र आजच्या धावपळीच्या युगात मुंबईतल्या उंच इमारती व खिडक्यांवर चढून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारणे अशक्य असल्याने पोर्टेबल गुढ्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे.

आज वसाहत व चाळींची जागा उतुंग इमारतींनी घेतली आहे. चाळीतील घराच्या खिडकीबाहेर सूर्य देवतेकडे डोकावणाऱ्या गुढी मुंबईत क्वचितच आढळून येतात. अशा स्थितीतही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी व परंपरा जपण्यासाठी युवकांना या पवित्र सणाचे महत्व पटवून देण्यासाठी घरची वडीलधारी मंडळी गुढी बांधण्यासाठी धडपड करताना दिसतात.

 अवघ्या सहा दिवसावर येऊन ठेपलेल्या गुढी पाडव्यासाठी दादरचा बाजार रंगीबेरंगी लहान मोठ्या आकर्षक इको फ्रेंडली गुढ्यांनी तसेच साखरेच्या हारांनी फुलला आहे. इको फ्रेंडली गुढीच्या काठीला आकर्षक सोनेरी पट्ट्याने गुंढाळलेला काठ, त्यावर तांब्याच्या धातूचा तांब्या, सोनेरी किनार असलेल्या विविध रंगाच्या छोट्याश्या साड्यांनी सजलेल्या दिसत आहेत. जीवघेण्या महागाईत पारंपरिक गुढीसाठी लागणारा खर्च परवडत नाही. तसेच उंच इमारती झाल्याने पारंपरिक पद्धतीने गुढी उभारणे शक्य नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून नववर्षाचे स्वागत इको फ्रेंडली गुढ्यांनी साजरे होत असल्याचे चित्र मुंबईत दिसत आहे. बाजारात साखरेचे हार २० ते  ८० रुपयांपर्यंत तर गुढी ८० ते ६०० रुपयांपर्यंत विकली जात आहे.

 हेही वाचा :

Back to top button