पिंपरी : प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला; कारवाईबाबत पालिका प्रशासनाची ढिलाई | पुढारी

पिंपरी : प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला; कारवाईबाबत पालिका प्रशासनाची ढिलाई

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सध्या वाढला आहे. 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदीची घोषणा त्यानंतर सिंगल यूज प्लास्टिकवर (एकल वापराचे प्लास्टिक) बंदी घालण्यात आली. तर, राज्य सरकारने विघटन होणार्‍या आणि एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकवरील निर्बंध शिथील केले. या फेरबदलामुळे विक्रेत्यांना मोकळे रान सापडले आहे.
महापालिका आरोग्य विभागाकडूनदेखील याबाबत सध्या ढिलाईचे धोरण राबविले जात आहे. त्याचप्रमाणे, शहरात विविध भागांमध्ये सध्या प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे.

विक्रेत्यांवर जुजबी कारवाई
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजी विक्रेते, फळविक्रेते, पथारी व्यावसायिक आणि छोट्या विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. नागरिकांनी भाजी, फळे घेण्यासाठी सोबत कापडी पिशवी आणली नसेल तर विक्रेते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये नागरिकांना भाजी, फळे देत आहेत. त्याचप्रमाणे किराणा दुकानांमध्ये देखील प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विविध वस्तू दिल्या जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. प्लास्टिक पिशव्यांचा वाढता वापर रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून जुजबी स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहे.

आदेश राहिले कागदावरच
पिंपरी-चिंचवडमध्ये 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी राहणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले होते. केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेनुसार याबाबत कठोर अंमलबजावणी सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबतच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले होते. मात्र, हे आदेश सध्या कागदावरच राहिले आहेत.

देशात 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. त्याअंतर्गत प्लॉस्टिकपासून बनविलेल्या 19 वस्तू बंद करण्यात आल्या. एकीकडे सिंगल यूज प्लास्टिकवर देशभरात बंदी घालण्यात आली असताना राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2022 च्या अधिसूचनेनुसार विघटन होणार्‍या आणि एकदाच वापरल्या जाणार्‍या (सिंगल यूज प्लास्टिक) प्लास्टिकवरील निर्बंध राज्यात शिथील केले. कंपोस्टेबल पदार्थापासून बनविण्यात येणारे सिंगल यूज प्लास्टिक अर्थात स्ट्रॉ, ताट, कप्स, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कंटनेर आदी वस्तूंचा त्यामध्ये समावेश आहे.

महापालिका आरोग्य विभागाकडून प्लास्टिक बंदीबाबत ग्रीन मार्शलच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसारदेखील अंमलबजावणी केली जात आहे.

                    – गणेश देशपांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी, महापालिका.

प्लास्टिक कचरा पर्यावरणासाठी घातक
पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागांमध्ये सध्या प्लास्टिकचा कचरा सर्रास जाळला जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. विशेषतः चिखली-कुदळवाडी, तळवडे या पट्ट्यात हा कचरा जाळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय, विविध भागांमध्ये प्लॉस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरुन कचरा रस्त्यांच्या कडेला, नदीपात्रात टाकण्यात येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. प्लास्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पेटविला जात असल्याने तो पर्यावरणासाठी घातक ठरत आहे.

Back to top button