केंद्राची महाशक्ती पाठीशी, मग राज्यातील सरकारला अडचण काय?, उद्धव ठाकरे यांचा सवाल  | पुढारी

केंद्राची महाशक्ती पाठीशी, मग राज्यातील सरकारला अडचण काय?, उद्धव ठाकरे यांचा सवाल 

पुढारी ऑनलाईन : जुनी पेन्शन पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे. यापेभाही मोठ्या संपाला आमचे सरकार सामोरे गेलेले. मग आता केंद्राची महाशक्ती असलेलं सरकार राज्यात असताना मागण्यांचे ओझे पेलायला काय हरकत आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केला. या संपात आम्ही संपकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. विधानसभेतून माध्यमांशी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले, किसान मोर्चा नाशिकहून मुंबईकडे येत आहे. त्यांच्या निषेधाकडे लक्ष दिले पाहिजे. याआधीही शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता तेव्हा आदित्य ठाकरे त्यांना भेटायला गेले  होते. मात्र आजपर्यंत या सरकारच्या बाजूने कोणीही या शेतकऱ्यांच्याकडे बोलायला गेले नाही. या सरकारकडून सर्वसामान्यांना झिडकारणं सुरू आहे. या सरकारचे शेतकऱ्यांकडे आणि त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांना एवढ्या लांबून चालत यावं लागणे हे लाजीरवाणं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्याच्या मागण्या जाणून घेतल्या पाहिजेत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पाला पंचामृत असे गोड नाव दिले, पण ते कृतीत उतरताना दिसत नाही. आमचे निर्णय योग्य वाटत होते, आमचे निर्णय तुम्हाला पटतात तर मग आमचे मविआ सरकार पाडले का? असा प्रश्नही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. राज्य अस्थिर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील लढाई ही केवळ आमची नाही तर लोकशाहीची लढाई असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button