नगर: बेईमानी करणार्‍यांची माती करू: चंद्रशेखर घुले; आमदार राजळेंच्या पराभवाचा संवाद मेळाव्यात निर्धार | पुढारी

नगर: बेईमानी करणार्‍यांची माती करू: चंद्रशेखर घुले; आमदार राजळेंच्या पराभवाचा संवाद मेळाव्यात निर्धार

शेवगाव तालुका (नगर), पुढारी वृत्तसेवा: शेवगाव तालुक्याच्या मातीशी राजकारणात बेईमानी करणार्‍यांची माती करू. लोकप्रतिनिधीचा पराभव करणे हेच आपले ध्येय असून, आगामी विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाकरी फिरविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात व्यक्त केला.

जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घुले यांचा पक्षांतर्गत गद्दारीमुळे पराभव झाल्यानंतर मंगळवारी (दि.14) शेवगाव येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिज घुले, बाळासाहेब ताठे, काकासाहेब नरवडे, कल्यान नेमाने, शिवशंकर राजळे, संदीप वर्पे, दिलीप लांडे, अरूण लांडे, संजय फडके, मयूर वैद्य, गणेश गव्हाणे, बाळासाहेब जगताप आदी उपस्थित होते.

घुले म्हणाले, लोकप्रतिनिधी भावनिक राजकारण करतात. आता बदल घडवायचा आहे. गेल्या साडेआठ वर्षांत रस्ते, वीज, उपकेंद्र, पाटपाणी, पिण्याचे पाणी, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बाराशे कोटींचे काय दिवे लावले, हे कोणालाही समजू शकले नाही. सर्वसामान्य जनतेसाठी सत्तेचा वापर करण्याची स्व. मारूतराव घुले पाटील यांची शिकवण असल्याने आमदारकीच्या कार्यकाळात आपण मतदारसंघाचा विकास केला. परंतु, या लोकप्रतिनिधीने तालुक्यात भांडणे लावली. दहा वर्षांच्या इतिहासात एवढे गुन्हे दाखल झाले नाही, तेवढे साडेआठ वर्षांत झाले. तालुक्याचे रणागंण करायचे आणि राजकीय पोळी भाजायची, हा त्यांचा उद्योग आहे. पाणी अडवा, पाणी जिरवापेक्षा, माणसं अडवा, माणसं जिरवा, असे प्रकार कधी पाहिले नाहीत, असा आरोप घुले यांनी केला.

शेवगाव नगरपरिषदेची पेठेतील जागा भाड्याने देऊन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी उभारलेल्या क्रीडा संकुलात परिषदेचे कार्यालय थाटले, ही शोकांतिका आहे. शेवगावला 14 दिवसांतून एकदा पाणी येते, याला जबाबदार कोण? असा सवाल करीत, आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार असून, पाथर्डी बाजार समिती कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेणार. या मतदारसंघाचा पूर्वीसारखा विकास करायचा असेल, तर परिवर्तना शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले.

प्रताप ढाकणे म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना निलंबित करावे. मुंबईला बुधवारी होणार्‍या राष्ट्रवादीच्या बैठकीत हा अहवाल सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्तविक जिल्हा युवकचे कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले. भाऊराव भोंगळे यांनी आभार मानले.

पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम

मेळाव्यात घुले पक्षातंराचा निर्णय घेणार की गद्दारी करणार्‍या संचालकांवर बोलणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकत आमदार मोनिका राजळे यांना सामोरे जाण्याचा निर्णय घेऊन त्यांनी राष्ट्रवादीशी एकनिष्ठता प्रकट केली. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्य चर्चांची हवाही त्यांनी काढून घेतली.

बॅटरीशिवाय घड्याळ चालणार नाही!

जिल्हा बँकेत आतापर्यंत फसवणुकीचे राजकारण कधीच झाले नाही. आता झालेले कटकारस्थान निषेधार्ह आहे. स्व.मारूरुतराव घुले पाटील यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीची पहिली सुरुवात केली. या घड्याळाची बॅटरी आम्ही आहोत. बॅटरीशिवाय घड्याळ चालू शकत नाही, असा इशारा यावेळी डॉ. क्षितिज घुले यांनी दिला.

Back to top button