जालियनवाला बाग हत्याकांडाशी लखीमपूरची तुलना केल्याने कारवाई | पुढारी

जालियनवाला बाग हत्याकांडाशी लखीमपूरची तुलना केल्याने कारवाई

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशात शेतकर्‍यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधार्‍यांना आला असावा. आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्‍त केली.

बारामतीतील गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते. छापेमारीनंतर चौकशी अद्याप सुरू आहे. त्यानंतर सविस्तर बोलता येईल, असे पवार म्हणाले. यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे.

अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा, याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे, असे पवार म्हणाले. काही लोक भाषणे करून अथवा पत्रकार परिषदा घेऊन आरोप करतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सीज कारवाई करण्यासाठी पुढे येतात ही आक्षेपार्ह बाब आहे, असे पवार म्हणाले.

मुंबई ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना घेऊन जाणारे लोक शासकीय यंत्रणेचे नव्हते. नंतर खुलासा करण्यात आला की, ते साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते.

साक्षीदार एखादी घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्यासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जातात. कारवाईवेळी पकडणे हे साक्षीदारांचे काम नव्हे. याचा अर्थ या कारवाईत काही पक्षीय लोकांना सामावून घेण्यात आले होते. ड्रग्जप्रकरणी कारवाई झालीच पाहिजे, परंतु ती या पद्धतीने नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

जरंडेश्‍वर’ बेनामी पद्धतीने विकत घेतला : सोमय्या

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने आणि व्यक्‍तीवर पडलेले आयकर विभागाचे छापे हा योगायोग की कारवाई, हे मी सांगू शकत नाही. पण जरंडेश्‍वरचा चालक, मालक आणि लाभार्थी कोण, याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे, असे आव्हान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांना दिले. पवार यांनी बेनामी पद्धतीने हा कारखाना विकत घेतला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Back to top button