पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने मागील दोन वर्षात पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू : सुधीर मुनगंटीवार | पुढारी

पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने मागील दोन वर्षात पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा :  विविध कारणांमुळे मागील दोन वर्षात पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे वनातील पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे, असा खुलासा वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे, आज शनिवारी दोन दिवसीय पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन पार पडले, यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र संयोजित, इको प्रो संस्था आयोजित व ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने वन अकादमी येथे आयोजित 35 व्या पक्षिमित्र संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या मान्यवरांच्या हस्ते वटवृक्ष आणि दीप प्रज्वलन करून  उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, संमेलनाध्यक्ष राजकमल जोब, वन प्रबोधिनीचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपविभागीय अधिकारी  मुरुगानंथन, महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. निनाद शाह, ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आयोजक इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले.

वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, विविध पक्षांची चित्रे बघून मन प्रफुल्लीत होते. पक्ष्याचा आवाज मनाला आनंद देतो. पक्षी सृष्टीतील देणगी आहे.  देशात २००० पासून २०२२ पर्यंत पर्यावरण समतोल बिघडल्याने पक्ष्याचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. पर्यावरण आरोग्य ठीक नसेल तर पक्षी जगणार नाही. त्यासाठी उपाययोजनांची गरज बोलून दाखविली. शासनाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षाचे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. सारस पक्ष्यासाठी ६२ कोटीची योजना आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ताडोबा- अंधारी प्रकल्पात पक्ष्याचे चित्र प्रदर्शन भरविण्यात यावे, त्याची माहिती क्यू आर कोड पद्धतीने देण्यात यावी, महाराष्टाव्यापी छायाचित्र पुरस्कार योजना घेण्याची सूचना मुनगंटीवार यांनी दिली.

Back to top button