

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: पालकांच्या संमतीनंतरच मुलांना शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
राज्य सरकारने इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
मुंबईतही ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. मात्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांना येणे सक्तीचे करण्यात येणार नाही. ज्या मुलांना शाळेत प्रवेश हवा असेल, त्यांच्याकडे पालकांचे संमतीपत्र असणे बंधनकारक आहे.
मुंबईतील महापालिकेसह खासगी शाळांचे इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.
हे वर्ग सुरू करायचे की नाही, याबाबत आज दुपारी दोन वाजता महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिक्षण समिती सदस्य व काही पालकांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
यात काही पालकांनी शाळा सुरु करण्यास संमती दर्शवली.
मात्र काही पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका कोणत्या उपाययोजना हाती घेणार असल्याची विचारणा केली.
यावर शिक्षण विभागाने मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले.
पालकांच्या संमतीपत्राशिवाय शाळेत प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
पालकांकडून संमतीपत्र घेऊन, शाळा व्यवस्थापन आपली सुटका करून घेत आहे.
उद्या एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर, शाळा व्यवस्थापन आपली जबाबदारी झटकून ती पालकांवर टाकण्यास मोकळी होईल.
त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घ्यावा, असे मत बहुतांश पालकांनी यावेळी व्यक्त केले.
सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे शाळा सुरू करताना काळजी घेतली जात आहे. मुंबई महापालिकेने कोरोनाबाबत राबविलेल्या उपाययोजनांची दखल देशपातळीवर घेतली आहे. शाळा सुरू करण्याबाबत महापालिका सावध पावले उचलत आहे.
हेही वाचा:
पहा व्हिडिओ