राजकीय भविष्याची चिंता सतावत असल्याने फडणवीसांवर पवारांचा आकस : आ. प्रवीण दरेकर | पुढारी

राजकीय भविष्याची चिंता सतावत असल्याने फडणवीसांवर पवारांचा आकस : आ. प्रवीण दरेकर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पवार कुटुंबियांना केवळ शरद पवार हेच एक महाराष्ट्राचे नेते आहेत असे वाटत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद यशस्वी रित्या निभावून त्यांचा भ्रम दूर केला. स्वतःच्या राजकीय भविष्याची चिंता त्यांना सतावत असल्याने पवार कुटुंबियांना देवेंद्र फडणवीस यांचा आकस आहे, असे मत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.

डोंबिवली मधील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कब्बडी चषक स्पर्धेला भाजप आमदार आणि माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित लावली होती. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि पुण्यात कोयता गँगने घातलेल्या धुडगुसावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असा शब्दात टोला हाणला होता. याच त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी महविकास आघाडीचं सरकार उलटवून जनतेच्या मनातील सरकार आणले. त्यामुळे फडणवीस यांच्या विषयी पवार कुटुंबियांच्या मनात द्वेष भरला आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

गृहमंत्री म्हणून फडणवीस उत्तम काम करत आहेत. इतकेच नव्हे तर शिंदे फडणवीस यांची जोडी राज्यात उत्तम काम करत आहे. आपले भविष्य काय अशी चिंता त्यांना सतावत आहे आणि म्हणूनच आकस मनात ठेवून सुप्रिया सुळे त्यांच्यावर टीका करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा :

Back to top button