पुणे: वाटमारी करणारा ओतुर पोलिसांच्या ताब्यात, चोराकडे असणारी दुचाकीही चोरीचीच | पुढारी

पुणे: वाटमारी करणारा ओतुर पोलिसांच्या ताब्यात, चोराकडे असणारी दुचाकीही चोरीचीच

ओतुर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: रविवारी (दि. २९) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या शेतमजूरास अडवून मारहाण करीत मोबाइल व ५०० रुपये बळजबरीने काढून पोबारा करणाऱ्यास ओतुर पोलिसांनी शिताफिने पकडले. त्याच्या ताब्यात असलेली दुचाकीही (एमएच १४ जीके ०५०७) चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले.

ओतुरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी याबाबत माहिती दिली. गणेश पानसरे (वय ३१ रा. ओतुर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या अंगझडतीत ५०० रुपये व चाेरलेला मोबाइल आढळून आला. ही घटना रविवारी (दि.२९) रात्री ०९:३० वाजता पिंपळगांव जोगा हद्दीत शनि मंदिरानजिक घडली. याबाबत विजय केदार यांनी तक्रार दाखल केली. गुन्हा घडल्यावर एपीआय कांडगे यांना माहिती मिळताच त्यांनी गस्तीवर असलेल्या पोलिस नायक एस.डी.गेंगजे व हवालदार भवारी यांना सूचना दिली. नाकाबंदीदरम्यान आरोपीला पकडण्यात यश मिळाले.

चोरीची दुचाकी ही संपत वाघ (रा.रांजनी, ता.आंबेगाव) यांची आहे. गणेश पानसरेला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले आहे. अधिक तपास जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतुर पोलिस करीत आहेत.

Back to top button