औरंगाबाद : बदली करुन देण्यासाठी खैरेपुत्राने घेतले २ लाख; ऑडिओ क्लिप व्हायरल | पुढारी

औरंगाबाद : बदली करुन देण्यासाठी खैरेपुत्राने घेतले २ लाख; ऑडिओ क्लिप व्हायरल

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे सरकारच्या काळात बदली करुन देण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषीकेश खैरे यांनी पैसे घेतल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये समोरची व्यक्ती काम न झाल्याने ऋषीकेश खैरे यांना बदलीसाठी दिलेले २ लाख रुपये परत मागत आहे. ऋषीकेश खैरे यांनीदेखील हा व्यवहार झाल्याचे मान्य केले असून संबंधिताचे पैसे परत देण्यात येतील असे म्हटले आहे.

बदलीचे हे प्रकरण वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. त्या महिला कर्मचाऱ्याचा पती आणि ऋषीकेश खैरे यांच्यातील हे संभाषण असल्याचे दिसत आहे. यामध्ये समोरची व्यक्ती ऋषीकेश यांच्याशी बदलीच्या व्यवहाराबाबत बोलत आहे. त्यात बदलीसाठी २ लाख रुपये दिल्याचा आणि बदलीचे काम झाले नाही, तरीही पैसे परत न मिळाल्याचा उल्लेख आहे. पैसे देऊन दीड दोन वर्ष झाल्याचाही उल्लेख संभाषणात आहे. त्यावरुन हे प्रकरण ठाकरे सरकारच्या काळातील असल्याचे समोर येत आहे.

ऋषीकेश यांच्याकडून त्या व्यक्तीला आठ दिवसात काम करुन देऊ किंवा पैसे परत देऊ अशी तयारी दाखविण्यात आली. त्यावर समोरील व्यक्ती काम करु नका, आता बदलीसाठी मी दुसऱ्याला पैसे देऊन बसलो आहे, तुम्ही पैसेच परत द्या, अशी मागणी करतो. शेवटी ऋषीकेश हे देखील ठिक आहे, आठ दिवसात पैसे देऊन टाकतो, असे म्हणताना आढळतात. सध्या ही क्लिप व्हायरल होत असून ठाकरे सरकारच्या काळात बदल्यांसाठी पैसे घेतले जात होते, अशी चर्चाही देखील सुरू झाली आहे.

होय, पैसे घेतले होते : खैरे

प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ऋषीकेश खैरे यांनी हा व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे. कोवीडच्या आधी काही मित्रांमार्फत एक जण माझ्याकडे आला होता, त्यांच्या पत्नीला बदली करुन घ्यायची होती, तेव्हा ठाकरे सरकार असल्याने आपण त्यांचे काम करुन देऊ असे वाटले होते. नंतर कोवीड आला आणि त्यानंतर सत्तांतर झाले, त्यामुळे त्यांचे काम राहून गेले, पण काही हरकत नाही, आपण त्यांचे पैसे परत देणार आहोत. आम्ही स्वत:साठी कधीही पैसे घेतलेले नाहीत. बदलीच्या कामासाठी समोरच्या व्यक्तीला देण्याकरिता ते घेतले होते, असेही ऋषीकेश खैरे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा :

Back to top button