कोल्हापूर : मुले पळवणारी टोळी समजून उत्तर प्रदेशातील सांधूचा पाठलाग; मोठा अनर्थ टळला | पुढारी

कोल्हापूर : मुले पळवणारी टोळी समजून उत्तर प्रदेशातील सांधूचा पाठलाग; मोठा अनर्थ टळला

गुडाळ (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : राधानगरी राज्यमार्गावर प्रवास करणाऱ्या उत्तर प्रदेश मधील साधूंच्या गाडीचा मुले पळणारी टोळी असल्याच्या संशयावरून कांडगाव (ता. करवीर) मधील ग्रामस्थांनी पाठलाग केला. मात्र राधानगरी पोलिसांनी सतर्कता दाखवत आवळी बुद्रुक येथील पोलीस पाटलामार्फत या निरपराध साधूंना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. राधानगरी पोलिसांनी या साधूंना पोलीस ठाण्यात आणून शहानिशा केल्यानंतर त्यांना मार्गस्थ करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, मथुरा (उत्तर प्रदेश) मधील ओमकारेश्वर धाम कच्छी बाबा आश्रमाचे महंत बालयोगी नागबाबा हे आपल्या दोन सहकारी साधू सह सोमवारी सकाळी कोल्हापूरमधून गणपतीपुळे, नाणीज आश्रमाकडे निघाले होते. कोल्हापूर मधून रत्नागिरी मार्गावर जाण्याऐवजी ते चुकून राधानगरी मार्गाकडे वळले. वाटेत दहाच्या सुमारास कांडगाव येथे आल्यानंतर तेथील एका युवकाकडे येथे मंदिर कोठे आहे? अशी त्यांनी विचारणा केली. काही दिवसापूर्वी शेजारच्या वाशी गावात मुले पळविणारी टोळी आल्याची कथित घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर ही तशीच टोळी असल्याचा कांडगाव येथील काही मंडळींचा गैरसमज झाला. ग्रामस्थांचा आक्रमक अवतार पाहून घाबरलेल्या साधूंनी न थांबता राधानगरी रस्त्याकडे कूच केली. गाडी वेगाने निघून गेल्यानंतर ही मुले पळविणारी टोळी असल्याचा ग्रामस्थांचा संशय दृढ झाला आणि दुसऱ्या एका वाहनाने आठ – दहा ग्रामस्थांनी साधूंच्या गाडीचा पाठलाग सुरू केला.

दरम्यान, गाडीतील एका तरुणाने राधानगरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. श्री. पाटील यांनी समय सूचकता दाखवीत भोगावती ते राधानगरी मार्गावरील सर्व पोलीस पाटलांना साधूंच्या मार्शल जीपचे वर्णन सांगून गाडी अडविण्याच्या सूचना दिल्या. शिवाय साधूना ताब्यात घेऊन पोलीस येइपर्यंत त्यांना संरक्षण देण्याच्या ही सूचना दिल्या.

आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील पोलीस पाटील नामदेव पोवार यांनी या वर्णनाची गाडी जाताना आढळल्यानंतर ती थांबविली आणि पोलिसांचा आदेश सांगून पोलीस येईपर्यंत त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बसण्याची सूचना केली. दरम्यानच्या काळात कांडगाव येथील संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर गाडी पाहून ग्रामपंचायत कार्यालयात आले आणि मुले पकडणारी टोळी ग्रामपंचायत डांबल्याची बातमी क्षणार्धात आवळी बुद्रुक गावात पसरली. कांडगाव आणि आवळी बुद्रुक येथील काही संतप्त तरुणांनी साधूंना आमच्या ताब्यात द्या असा घोषा लावला. मात्र पोलीस पाटील नामदेव पोवार आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रा. आनंदराव कवडे यांनी परिस्थिती संयमाने हाताळून तरुणांना शांत केले.

एवढ्यात राधानगरीचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील आणि संतोष पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांना शांत करत साधूंना ताब्यात घेऊन राधानगरी पोलीस ठाण्यात नेले. कांडगाव ग्रामस्थांनाही त्यांनी सोबत येण्याची सूचना केली. पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक एन. ए. खान यांनी साधूंच्या आधार कार्डची पडताळणी तसेच त्यांच्या आखाड्याशी संपर्क साधून साधूंच्या सत्यतेची शहानिशा केली. तेव्हा गैरसमजाने हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. कांडगाव ग्रामस्थांची ही खात्री पटल्यानंतर साधूंना पुढील प्रवासासाठी रवाना केले. कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस पाटील नामदेव पोवार, प्रा. कवडे यांनी सतर्कता आणि समय सूचकता दाखवली नसती तर या साधूंच्या बाबतीत मोठा अनर्थ घडला असता.

दरम्यान,मुले पळवणारी टोळी आली या बहुतांश अफवा असल्याचे दिसून येत असून अशी संशयित घटना आढळल्यास नागरिकांनी कायदा हातात घेण्यापूर्वी जबाबदार घटकांकडून प्रथम त्याची शहानिशा करून घ्यावी, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एन. ए. खान यांनी केले आहे.

अधिक वाचा :

Back to top button