Stock Market Updates | तेजी आली अन् क्षणात गेलीही, वाचा शेअर बाजारात आज नेमकं काय घडलं?

Stock Market Updates | तेजी आली अन् क्षणात गेलीही, वाचा शेअर बाजारात आज नेमकं काय घडलं?
Published on
Updated on

Stock Market Updates : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि HDFC बँकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक कमाईच्या तिमाही अहवालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने आज सोमवारी (दि.१६) तेजीत सुरुवात केली होती. पण ही तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही. सोमवारी (दि.१६) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० अंकांनी वाढला तर निफ्टीने १८ हजारांवर व्यवहार केला. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास सेन्सेक्स २८० अंकांनी घसरला होता. तर निफ्टी १७,९०० च्या खाली आला होता. त्यानंतर सेन्सेक्स १६८ अंकांच्या घसरणीसह ६०,०९२ वर बंद झाला. तर निफ्टी १७,८९४ पर्यंत खाली येऊन बंद झाला. आजच्या व्यवहारात आयटी शेअर तेजीत राहिले. तर ऑटो शेअर्स मागे पडलेले दिसले. तसेच जिंदाल स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, हिंदाल्को आदी मेटल शेअर्सही घसरले. गेल्या शुक्रवारी सेन्सेक्स ३०३ अंकांनी वधारून बंद झाला होता. पण ही तेजी आज टिकून राहिलेली नाही.

एचडीएफसी बँकेचे शेअर ‍वधारले

तिसऱ्या तिमाहीच्या नफ्यात वाढ नोंदवल्यानंतर एचडीएफसी बँकेचा शेअर १.५ टक्क्याने वाढला. हा शेअर निफ्टी ५० निर्देशांकावर आघाडीवर होता. तर L&T फायनान्स होल्डिंग्जचा शेअर बीएसईवर सोमवारच्या व्यवहारात ६.३ टक्के वाढून ९८.२५ रुपयांवर पोहोचला. कारण L&T कंपनीने डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३९ टक्के वाढ नोंदवली आहे.

'हे' होते टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स

सकाळच्या व्यवहारात येस बँक, एल अँड टी फायनान्स होल्‍डिंग्ज लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, टाटा स्टील, व्होडाफोन आयडिया, आयडीएफसी बँक, फेडरल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक यांचे शेअर्स वधारले होते. त्यानंतर कोटक बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल), इन्फोसिस, टीसीएस, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, एचसीएल टेक आणि विप्रो हे बीएसईवर सर्वाधिक वाढले. निफ्टीवर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, कोटक बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडसइंड बँक हे टॉप गेनर्स होते. तर अदानी एंटरप्राइजेस, आयशर मोटर्स, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, महिंद्रा. अँड महिंद्रा, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एसबीआय लाइफ आणि अपोलो हॉस्पिटल्स हे टॉप लूजर्स होते.

PSU बँक निर्देशांकाची चांगली कामगिरी

NSE निफ्टी ५० मधील ०.२७ टक्के घसरणीच्या तुलनेत निफ्टी PSU बँक निर्देशांकाने १.८४ टक्के वाढून ४,३५८.६५ वर व्यवहार केला. PSU बँक निर्देशांकात युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांनी चांगली कामगिरी केली.

जपानचा येन वधारला, आशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण

महागाई कमी होत असल्यामुळे सोमवारी आशिया-पॅसिफिकमधील बाजारपेठांमध्ये संमिश्र वातावरण राहिले. एकूणच गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहे. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत जपानचे अधिकृत चलन येन मजबूत झाल्यामुळे टोकियोचे शेअर्स सोमवारी खाली आले होते. डॉलरच्या तुलनेत येन १२७.८७ वर पोहोचला आहे. निक्केई २२५ निर्देशांक १.१४ टक्के म्हणजेच २९७ अंकांनी घसरून २५,८२२ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.८८ टक्के म्हणजेच १६.७७ अंकांनी घसरून १,८८६ वर आला. चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक सोमवारी ३२.२९ अंकांनी म्हणजेच १.०१ टक्के वाढून ३,२२७.५९ वर बंद झाला. हाँगकाँगचा हँग सेंग ८.०६ अंकांनी वाढून २१,७४६ वर आला. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news