नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला | पुढारी

नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला

पुढारी ऑनलाईन: मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज ( दि. ३० ) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्‍यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे मलिक यांना यावेळी देखील कोणताही दिलासा मिळालेला नाही.

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज विशेष न्यायालयात सुनावणी झाली. न्‍यायालयाने दुपारी साडेतीनपर्यंत सुनावणी तहकूब केली होती. यानंतर पुन्‍हा सुनावणी झाली. यावेळी न्‍यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.

यापूर्वी १४ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद झाला होता. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी मलिक यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने यावेळी २४ नोव्हेंबर रोजी आपला आदेश सुनाण्‍यात येईल, असे स्‍पष्‍ट केले होते. त्यादिवशी आदेश तयार नसल्याचे सांगत प्रकरणाची सुनावणी ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली होती.

मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फेब्रुवारी २०२२ मध्‍ये  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अटक केली होती. मलिक यांनी जुलैमध्ये विशेष न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार  सुरू आहेत.

हेही वाचा:

 

Back to top button