भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार | पुढारी

भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन १६९ वर्षे जुने आणि गॉथिक शैलीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून भायखळा रेल्वे स्थानकाची ओळख आहे. या रेल्वे स्थानकाला युनेस्कोने आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी बँकॉकमध्ये आशिया-पॅसिफिक युनेस्को पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

मध्य रेल्वेवरील ऐतिहासिक आणि महत्त्‍वाचे स्थानक असलेल्या भायखळा रेल्वे स्थानकाला नवा लूक देण्यात आला आहे. भायखळा स्थानकाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी चार वर्षापासून काम सुरु असलेले सुशोभिकरणाचे काम पूर्ण करुन २९ एप्रिल रोजी पूर्ण झाले. त्यानंतर स्थानक अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे सुपूर्द करण्यात आले. भायखळा स्थानकाच्या पश्चिमेकडे २६ कमानी आहेत. या कमानींवरील फुलांवर सुंदर आणि रेखीव असे नक्षीकाम केले आहे. हे नक्षी काम पुन्हा जिवंत केले आहे. तसेच स्थानकाबाहेरील भिंती स्वच्छ केल्या आहेत. छतावरील जुनी कौले काढून त्याजागी साजेशी अशी कौले लावली आहेत. दरवाजे आणि भिंतींना नवीन झळाळी देऊन भिंती पॉलीश करून चमकविल्या आहेत.

मुंबई हेरिटेज कमिटी, आय लव्ह यू मुंबई बजाज ट्रस्ट ग्रुप’, आभा लांबा असोसिएशन यांच्यावतीने सीएसआर अंतर्गत भायखळा स्थानकाला जुने रूप देण्याचे काम करण्यात आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. या रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम कोरोना काळात हाती घेण्यात आले. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये या मुजरांना घरी पाठवण्याऐवजी ४ महिने स्थानकाच्या आवारात ठेवण्यात आले होते.

देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांमध्ये भायखळा स्थानकाचा समावेश

भायखळा हे मेन लाईनवरील गर्दीचे स्थानक आहे. हे रेल्‍वे स्थानक हेरिटेज ग्रेड वनमध्ये येते. देशातील सर्वाधिक जुन्या स्थानकांमध्ये भायखळा स्थानकाचा समावेश आहे. १८५३ साली या स्थानकाची बांधणी लाकडाचा वापर करून केली. त्यानंतर १८५७ साली पुन्हा नव्याने बांधकाम केले. तेच बांधकाम आजही कायम आहे. या स्थानकाला १८५७ सालचा लूक देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button