नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर, पुढारी वृत्तसेवा : Indian Railway रेल्वे विभागाच्या अनारक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त होणाऱ्या महसुलात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अनारक्षित प्रवासी श्रेणीतून ६ हजार ५१५ कोटींचे महसूल प्राप्त झाले. गतवर्षी याच कालावधीत मिळालेल्या १ हजार ८६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ ५०० टक्क्यांच्या घरात असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
Indian Railway या कालावधीत अनारक्षित प्रवासी श्रेणीत प्रवाशांची एकूण संख्या जवळपास २६८.५६ कोटी असून गतवर्षी याचकाळात हे प्रमाण ९०.५७ कोटी एवढे होते. यात १९७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. रेल्वेने प्रवासी श्रेणीतून या कालावधीत अंदाजे ३३ हजार ४७६ कोटी रुपये महसूल गोळा केला. गतवर्षी याच कालावधीत रेल्वेचे उत्पन्न १७ हजार ३९४ कोटी एवढे होते. यंदा एकूण उत्पन्नात ९२% वाढ नोंदवण्यात आली आहे.
Indian Railway १ एप्रिल ते ८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आरक्षित प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या ४२.८९ कोटी आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३४.५६ कोटीच्या तुलनेत २४% अधिक आहे. या कालावधीत आरक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल २६ हजार ९६१ कोटी रुपये आहे. मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त १६ हजार ३०७ कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत ही वाढ ६५% असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
हे ही वाचा :