सप्टेंबरच्या पगारासाठी एसटीला ३०० कोटींचा निधी | पुढारी

सप्टेंबरच्या पगारासाठी एसटीला ३०० कोटींचा निधी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाला तीनशे कोटींचा निधी वितरीत करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गृहविभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पगारासाठी ७२८.५० कोटींचा निधी वितरीत करण्याची मागणी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार ३०० कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी २२ सप्टेंबर रोजी वेतनासाठी शंभर कोटींचा निधी वितरीत करण्यात आला होता.

दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावे, महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जवळपास सहा महिने संप केला होता. त्यावेळी सरकारने काही प्रमाणात वेतनवाढ करत नियमित वेतनासाठी निधी देण्याची जबाबदारी घेतली होती. त्या अनुषंगाने अर्थसंकल्पातही त्या अनुषंगाने तरतुद करण्यात आली होती.

सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १४५० कोटी आणि पुरवणी मागण्याद्वारे एक हजार कोटी असे एकूण २ हजार ४५० कोटी मंजूर करण्यात आले होते. यातील शिल्लक निधीतून सप्टेंबर महिन्यातील पगारासाठी ३०० कोटींचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा :

Back to top button