'जिंकून दाखवणारच' निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया | पुढारी

'जिंकून दाखवणारच' निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईनडेस्क : निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठविल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी ‘जिंकून दाखवणारच’ असा निर्धार केला आहे. हा फोटो त्यांनी इन्स्टावर शेअर केला आहे.

‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि पक्षाचे नाव ‘शिवसेना’ तूर्त कुणालाही वापरता येणार नाही, असे आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री जारी केले. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेना विरुद्ध शिंदे गट फैसला होणे शक्य नसल्याने आयोगाने हा हंगामी निर्णय घेतला. सोमवारी या दोन्ही गटांना आपल्या पक्षासाठी नवे नाव आणि नवे चिन्ह निवडण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. आता उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी नवे चिन्ह निवडावे लागेल. पक्षाचे नवे नावही त्यांना निवडता येईल. विधानसभा पोटनिवडणुका जाहीर झाल्यामुळे खरी शिवसेना कोणती आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कुणाला द्यायचे, याचा फैसला करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे शक्य नाही. मात्र, या वादाचा पोटनिवडणुकीवर होणारा परिणाम पाहता धनुष्यबाण गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्टपणे नमूद केले आहे.

‘जिंकून दाखवणारच’ उद्धव ठाकरेंची इन्स्टापोस्ट

धनुष्यबाण चिन्ह गोठवून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला. त्यामुळे शिवसेना तूर्त कुणाचीच नाही हे स्पष्ट झाले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी इन्स्टावर बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘जिंकून दाखवणारच’ अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.

दोन्ही गटांच्या आज बैठका

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव दोन्हींचा ताबा निवडणूक आयोगाने आपल्याकडे घेताच मुंबईत राजकीय खळबळ उडाली आणि वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाची तातडीची बैठक बोलावली. सर्व नेते आणि मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले असून रविवारी सायंकाळी 7 वाजता होणार्‍या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनीही रविवारी दुपारी 12 वाजता आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात म्हणजेच घटनापीठासमोर आव्हान देण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. धनुष्यबाण चिन्हाबद्दल आणि खरी शिवसेना कुणाची याचा फैसला करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मुभा घटनापीठानेच आयोगाला दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uddhav Thackeray (@uddhavthackeray)

हेही वाचा :

 

Back to top button