कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा शिवसेना आमचीच असून, धनुष्यबाण हे चिन्हही आमचेच आहे. त्यामुळे आमचा दावा कायमस्वरूपी आहे, तो पुढील सुनावणीत भक्कमपणे मांडू. निवडणूक आयोग आम्हाला न्याय देईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव आम्हालाच मिळेल, असा विश्वास कोल्हापूरचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी अजूनही आघाडीत आहे की नाही, हे जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या मित्रपक्षाच्या चिन्हाचा पर्याय त्यांच्यापुढे असल्याचा खोचक टोलाही केसरकर यांनी लगावला.
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाविषयी विचारता केसरकर म्हणाले, 70 टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी आमच्या बाजूने आहेत. एका आमदाराला सुमारे अडीच लाख लोक मतदान करतात. एका खासदाराला सुमारे बारा ते पंधरा लाख लोक मतदान करतात. त्यामुळे जनताही आमच्या बाजूने आहे. कार्यकारिणीतील पदाधिकारीही आमच्या बाजूने आहेत. शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात सुमारे 70 हजार शिवसैनिक होते; मात्र बीकेसीवर झालेल्या आमच्या मेळाव्यात सुमारे पावणेतीन लाख शिवसैनिक होते. यावरून शिवसैनिकही आमच्या बाजूने आहेत, हे स्पष्ट होते. त्यामुळे बाळासाहेबांची, त्यांच्या विचारांची शिवसेना ही आमचीच आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच आहे. आमची बाजू खरी असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळेल.
निवडणूक आयोगासमोर बोगस प्रतिज्ञापत्र सादर करणारे कोण आहेत हे माहीतच आहे, असे सांगत निवडणूक आयोग त्याची दखल घेईलच, असे सांगत केसरकर म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप असा युतीचाच उमेदवार असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार निश्चित करतील, असे सांगत यापूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हीच युती बघून लोकांनी पसंती दिली होती. या पुढच्या निवडणुकीत याच युतीला पसंती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने नवे चिन्ह सुचवण्याबाबत सूचना केली आहे; मात्र याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्याखेरीज काही सांगता येणार नाही, असे स्पष्ट करत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना कधीच जवळ केले नाही त्यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी संगत केली. अजूनही ते त्यांच्यासोबत आघाडीत आहेत की नाही, हे जाहीर करत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रपक्षाचे चिन्ह पर्याय म्हणून आहे, असे त्यांनी सांगितले.