मानवरहित बोटींची पुण्यात यशस्वी चाचणी: ‘डीआरडीओ’ने नोंदवला विक्रम | पुढारी

मानवरहित बोटींची पुण्यात यशस्वी चाचणी: ‘डीआरडीओ’ने नोंदवला विक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: भारतीय संरक्षण दलात स्वदेशी बनावटीची शस्त्रे, विमाने आली असून, संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) ” आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत मानवरहित बोटींची पुण्यात यशस्वी चाचणी करण्यात यश मिळवले आहे.
देशातील खासगी उद्योग व स्टार्टअप हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपकरणे, शस्त्रास्त्र आणि प्रणाली विकसित करण्यावर भर देत आहेत. याचाच एक भाग म्हणून डीआरडीओने ‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग’ या स्टार्टअपच्या मदतीने मानवरहित शस्त्रास्त्र सज्ज बोटीची निर्मिती केल्याचा विक्रम केला आहे.

तीन रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात येणार्‍या या मानवरहित बोटींची नुकतीच डीआरडीओच्या अधिकार्‍यांद्वारे खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणावर यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘डिफेन्स एक्स्पो 2022’ च्या कार्यक्रमापूर्वी या चाचण्या पुण्यात घेण्यात आल्या आहेत. शस्त्रास्त्र असलेल्या या बोटींच्या कार्यक्षमतांचे परीक्षण करण्यासाठी ही चाचणी जलाशयात करण्यात आली. यामुळे आता सागरी सुरक्षेच्या आणि हिंदी महासागर परिसरात देशाची क्षमता सिद्ध होणार आहे.

सागरी सीमाभागात गस्त घालणे, पाळत ठेवणे, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवत वेळेत कारवाई करण्यासाठी माहिती पोचविणे, अशा सर्व बाबी या बोटींच्या माध्यमातून साध्य होणार आहेत. भविष्यात या बोटींचा वापर केल्याने विविध कारवाईमध्ये होणार्‍या जीवितहानी टाळली जाऊ शकते. या मानवरहित बोटींपैकी काही शस्त्रास्त्र सज्ज बोटीमध्ये लिथियम बोटीसह इलेक्ट्रिक प्रॉपल्शन प्रणाली उपलब्ध आहे. ही बोट समुद्रात चार तास आपली मोहीम पार पाडू शकते. सध्या ही बोट प्रतितास 10 नॉटिकल मैलांपर्यंतचा प्रवास करू शकते. दरम्यान, बोटीचा वेग 25 नॉटिकल मैलांपर्यंत वाढविण्यासाठी काम सुरू आहे.

स्टार्टअपमध्ये पुणे…
सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. ही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाद्वारे हिंदी महासागरात अनेक मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमांसाठी मानवरहित बोटी उपयुक्त ठरतील. या मानवरहित बोटींच्या निर्मितीसाठी डीआरडीओसमवेत पुण्यातील एका स्टार्टअपने मोलाची भूमिका बजावली आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या स्टार्टअपद्वारे या बोटीची निर्मिती केली आहे. त्यामुळे पुण्याचे नाव लष्करी दलात कोरले गेले आहे.

…अशी असेल मानवरहित बोट
बोटीचा वेग 10 नॉटिकल मैल प्रतितास
वेगवेगळ्या प्रकाराची कार्यक्षमता बोटीत
यातील विशेष तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शत्रूच्या ताब्यात आल्यास या बोटीतील नियंत्रण फलक आपोआप नष्ट होईल
शत्रूला कोणत्याही प्रकारचा डेटा किंवा माहिती मिळणार नाही
डिफेन्स एक्स्पो गांधीनगरला होणार
संरक्षण मंत्रालयाच्या वतीने संरक्षण
क्षेत्रातील विविध उपकरणे, शस्त्रास्त्र प्रणाली आदींचे प्रदर्शन डिफेन्स एक्स्पो 18 ते 22 ऑक्टोबरदरम्यान गुजरातच्या गांधीनगर येथे होणार आहे. यामध्ये डीआरडीओसह देशभरातील विविध उद्योग आणि स्टार्टअप सहभाग घेणार

Back to top button