एनआयए, ईडीची देशभरात छापेमारी, १०६ पीएफआय कार्यकर्ते ताब्यात | पुढारी

एनआयए, ईडीची देशभरात छापेमारी, १०६ पीएफआय कार्यकर्ते ताब्यात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) प्रमुख नेत्यांसह देशभरातील १०० हून अधिक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सकाळी छापेमारी सुरु केली. या कारवाईमध्ये तपास यंत्रणानी आतापर्यंत पीएफआयशी संबंधित १०६ जणांना ताब्यात घेतले आहे. यात केरळमध्ये सर्वाधिक २२ जणांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रत्येकी २० जणांचा समावेश आहे.

एनआयए आणि ईडीने राज्यांतील एटीएस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश अशा एकूण १० राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये पीएफआय नेत्यांपैकी केरळमध्ये २२, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून प्रत्येकी २०, तामिळनाडूमध्ये १०, आसाममध्ये ९, उत्तर प्रदेशमध्ये ८, आंध्र प्रदेशमध्ये ५, मध्य प्रदेशमध्ये ४, दिल्ली आणि पुद्दुचेरी येथे प्रत्येकी ३ व राजस्थानमध्ये २ जणांना पकडण्यात आले. तर, कर्नाटकातील मंगळूर येथे एनआयएच्या छाप्याला विरोध करत असलेल्या पीएफआय आणि एसडीपीआयच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दहशतवादी फंडिंग, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी लोकांना कट्टरपंथी बनवणे यात कथितरित्या गुंतलेल्यांच्या ठिकाणी दहशतवादविरोधी शोध घेण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणाकडून सध्या सुरू असलेल्या छाप्यांमध्ये मुख्यत: दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत आहे. दरम्यान, पीएफआयने एका निवेदनात, त्याच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक नेत्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. फासिस्ट राजवटीचा विरोध करणारे आवाज शांत करण्यासाठी तपास यंत्रणांचा अशाप्रकारे वापर करण्याचा तीव्र निषेध करतो, असे म्हटले आहे.

नाशिक : महापालिकेच्या जागेवर उभारली व्यावसायिक इमारत, सिटी सर्व्हेच्या नोंदीही गायब

एनआयएने या महिन्याच्या सुरुवातीला पीएफआय प्रकरणात तेलंगणा, आंध्र प्रदेशात ४० ठिकाणी छापेमारीकरुन चार जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत एनआयएने काही डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, दोन खंजीर आणि ०८ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रोकड यासह गुन्हेगारी साहित्य जप्त केले होते. हे चौघे दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे आयोजित करत होते, असा आरोप आहे.

१९९२ मध्ये बाबरी मशीद विध्वंसानंतर सुरू झालेल्या तीन मुस्लिम संघटनांच्या विलीनीकरणानंतर २००६ मध्ये केरळमध्ये पीएफआय सुरू करण्यात आले. नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तमिळनाडूच्या मनिथा नीथी पासारी या तीन संघटना होत्या. तर, अल्पसंख्याक समुदाय, दलित आणि समाजातील इतर दुर्बल घटकांतील लोकांना सशक्त करण्यासाठी वचनबद्ध असलेली एक नव-सामाजिक चळवळ म्हणून काम करत असल्याचा दावा पीएफआयकडून केला जात आहे.

Back to top button