औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर | पुढारी

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याचा प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आली आहे.

डान्सबारवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत सांगितले. भाजप-शिवसेना युतीचे सरकार १९९५ मध्ये सत्तेत आल्यानंतर तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी औरंगाबाद तसेच उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावे बदलली होती. मात्र न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर तिथे हे निर्णय रद्द झाले. त्यानंतर गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे सरकारने जाता जाता पुन्हा एकदा संभाजीनगर व धाराशिव ही नावे या दोन्ही शहरांना दिली होती. मात्र, राजकीय साठमारीत नवीन सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर शिंदे सरकारने पुन्हा एकदा नामांतरणाला मंजुरी दिली.

धाराशिवचा इतिहास

याबाबतचा इतिहास चाळायचा म्हटला तर निजामकालीन राजवटीत उस्मानाबाद या नावाचे गाव आढळत नाही. पूर्वीचे हे धाराशिव नावाचे छोटेसे गाव पुढे १९०२ मध्ये उस्मानाबाद झाले. धाराशिव गावात धारासूरमर्दिनी देवीचे मंदिर आहे. या मंदिराला लागूनच गावाची शिव असल्याने धाराशिव हे नाव या गावाला पडले होते, असे सांगितले जाते.

निजामाने धाराशिवचे नामकरण उस्मानाबाद केले

मराठवाड्यातील सर्वांत उंचावर असलेले धाराशिव हे दुसर्‍या क्रमांकाचे ठिकाण आहे. निजामाला हे गाव आवडले. येथे हा राजा बर्‍याचदा राहायलाही यायचा. निजामाने धाराशिवचे नाव १९०२ मध्ये बदलून आपल्या मुलाचे म्हणजे मीर उस्मान अलीचे नाव दिले. तेव्हापासून धाराशिव ‘उस्मानाबाद’ झाले. १९०२ पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय नळदुर्ग येथे होते. उस्मानाबाद नामकरण झाल्यानंतर मात्र जिल्ह्याचे मुख्यालय निजामाने उस्मानाबादेत हलवले.

Back to top button