अशी होते शहराच्या नामांतराची प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर… | पुढारी

अशी होते शहराच्या नामांतराची प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशभरात आतापर्यंत 21 राज्यांनी 244 शहरांची नावे बदलली आहेत. नुकतेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान, एखाद्या शहराचे नामांतर करावयाचे असल्यास त्याचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळाला असतो. शहराच्या नामांतराचा ठराव मंत्रिमंडळात पास झाला की, तो केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला जातो. त्यानंतर हे मंत्रालय रेल्वे, डाक आदी विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र घेते. आणि नामांतराची प्रक्रिया पूर्ण होते.

बॉम्बेचे मुंबई झाले, मद्रासचे चेन्‍नई, अलाहाबादचे प्रयागराज झाले. आता महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर होत आहे. एका शहराचे नाव बदलायचे तर सरासरी खर्च 300 कोटी रुपयांपर्यंत होतो. शहर मुंबई, चेन्‍नईसारखे मोठे असेल तर हा खर्च 1 हजार कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांच्या चुकांमुळे अनेक शहरांची नावे बदलावी लागली. उदाहरणार्थ त्रिवेंद्रमचे तिरुवनंतपूरम आणि कोचीनचे कोच्ची करण्यात आले. विविध कारणांनी आजअखेर 21 राज्यांनी एकूण 244 शहरांची नावे बदलली आहेत. उत्तर प्रदेशात त्यावरून वाद होत असले तरी सर्वाधिक 76 नामांतरे आंध्र प्रदेशात झाली आहेत. तामिळनाडूत 31, केरळात 26, तर महाराष्ट्रामध्ये 18 शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. 9 राज्यांची (उदा. युनायटेड प्रोव्हिन्सचे उत्तर प्रदेश झाले) तसेच 2 केंद्रशासित प्रदेशांची नावेही (उदा. पाँडिचेरीचे पुद्दुचेरी) स्वातंत्र्यानंतर बदलली आहेत.

नामांतराची प्रक्रिया कशी होते ?

राज्याचे नामांतर : घटनेच्या कलम 3 मध्ये राज्याच्या नामांतराची तरतूद नमूद आहे. राष्ट्रपतींच्या शिफारसीनुसार राज्याच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकार पारित करू शकते. राज्यालाच नाव बदलायचे असेल तर विधानसभेत तसा प्रस्ताव पारित करावा लागेल.

सर्वाधिक गावे रामाच्या नावावर

देशातील एकूण गावे 6.77 लाख आहेत.
सर्वाधिक 3,626 गावांची नावे प्रभू रामचंद्रांच्या नावावर.
खालोखाल श्रीकृष्णाच्या नावावर 3,309 गावे आहेत.
अकबराच्या नावावर 234 गावांची नावे आहेत.
बाबरच्या नावावर 62, हुमायूच्या नावावर 30, शहाजहानच्या नावावर 51 गावे आहेत.
औरंगजेबाच्या नावावर 8 गावे उत्तर प्रदेशातील एकट्या बिजनौरमध्ये आहेत.
औरंगाबाद नावाची दोन शहरे देशात आहेत, पैकी महाराष्ट्रातील औरंगाबादचे नामांतर निश्‍चित झाले आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबादपूर्वी मध्य प्रदेशातील होशंगाबादचे नामांतर चालू वर्षात होऊन ते नर्मदापूरम करण्यात आले आहे.
अलीगड, मिर्झापूर, सुलतानपुर, फिरोझाबाद, शाहजहांपूर, बदायू आदी 12 शहरांची नामांतरे प्रस्तावित आहेत.

Back to top button