Guru Pushyamrut Yog 2022 : गुरुपुष्यामृत योग मुहूर्तावर सोने खरेदी करताय, जाणून घ्या दर | पुढारी

Guru Pushyamrut Yog 2022 : गुरुपुष्यामृत योग मुहूर्तावर सोने खरेदी करताय, जाणून घ्या दर

पुढारी डेस्क : आज गुरुपुष्यामृत योग (Guru Pushyamrut Yog 2022) आहे. हा प्रमुख महत्त्वाचा योग आहे. या योगाला अमृतसिद्धी योग असेही म्हटले जाते. या योगावर केलेली खरेदी शुभ मानली जाते. बरकत देणारी ठरते, असे म्हटले जाते. या मुहूर्तावर खरेदी सोन्याची केली जाते. (Gold prices today) शुद्ध सोने (२४ कॅरेट) प्रति १० ग्रॅम ५१,५५० रुपयांवर व्यवहार करत आहे. गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोने प्रति १० ग्रॅम ३२० रुपयांनी महागले. दरम्यान, चांदीचा भाव १०० रुपयांनी वाढून ५५ हजार रुपये प्रति किलो झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव गुरुवारी २५० रुपयांनी वाढून ४७,२५० रुपयांवर होता.

मुंबई आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,५५० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,२५० रुपये आहे. तर दिल्लीत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५१,७१० रुपये आणि ४७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. डॉलरमध्ये घसरण झाल्याने गुरुवारी सोन्याच्या किमती वाढल्याचे दिसून आले.

दरम्यान, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एक किलो चांदीचा भाव ५५ हजार रुपयांवर होता. चेन्नई, बंगळूर, हैदराबाद आणि केरळमध्ये चांदी ६०,९०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. (Gold prices today)

सुवर्ण धातू हा राजधातू मानला जातो आणि गुरुपुष्यामृत योगावर (Guru Pushyamrut Yog 2022) त्याची खरेदी केल्यास ती शुभ आणि अक्षय्य स्वरूपाची ठरते, असे म्हटले जाते. दर महिन्याला येणार्‍या पुष्य नक्षत्रावर थोडे-थोडे सोने खरेदी करून त्याचा पुष्य नक्षत्रावर दागिना बनवण्याचाही प्रघात आहे. पुष्य नक्षत्रावर सोने खरेदी केल्याने उत्तरोत्तर समृद्धी प्राप्त होते, अशीही लोकमानसातील भावना आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते व त्यासाठी आधीपासून नियोजनही केले जाते.

स्वस्तात सोने खरेदीची संधी

जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेची (Sovereign Gold Bond Scheme (SGBS) दुसरी सीरिज २२ ऑगस्ट रोजी खुली झाली आहे. २०२२-२३ मधील एसजीबीएसची ही दुसरी सीरिज आहे. या योजनेत तुम्ही २६ ऑगस्ट पर्यंत गुंतवणूक करु शकता. सार्वभौम सुवर्णरोखे ही योजना भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून राबविली जाते.

या योजनेत प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५,१९७ रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करत असाल तर प्रति ग्रॅम ५० रुपये डिस्काउंट मिळणार आहे. RBI ने १९ ऑगस्ट रोजी या योजनेची सविस्तर माहिती जारी केली आहे. डिस्काउंटमुळे गुंतवणूकदारांना एक ग्रॅम सोने ५,१४७ रुपयांना मिळणार आहे. या गोल्ड बाँड योजनेत भारतीय नागरिक, ट्रस्टस, विद्यापीठ आणि चॅरिटेबल संस्था गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा कालावधी ८ वर्षाचा आहे. जर तुम्हाला या आधीच पैसे काढायचे असतील तर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढू शकता.

या योजनेत कोणताही गुंतवणूकदार कमीत कमी एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतो. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी कमाल गुंतवणूक मर्यादा ४ किलोग्रॅम एवढी असेल. ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २० किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतात.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

 हे ही वाचा :

Back to top button