गुरुपुष्यामृत : अमृतसिद्धी योग - पुढारी

गुरुपुष्यामृत : अमृतसिद्धी योग

सुरेश पवार

ज्योतिष शास्त्रात जे महत्त्वाचे शुभयोग सांगितले आहेत, त्यात गुरुपुष्यामृत योग हा प्रमुख महत्त्वाचा योग आहे. या योगाला अमृतसिद्धी योग असेही म्हटले जाते. विवाह वगळता अन्य सर्व कार्यांसाठी हा योग अत्यंत शुभ मानलेला आहे. या योगावर केलेली खरेदी शुभ मानली जाते. बरकत देणारी ठरते, असे म्हटले जाते. या योगावर सुरू केलेले कार्य, उद्योग, व्यवसाय यांची भरभराट होते, असे मानले जाते.

सत्तावीस नक्षत्रांत पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. वनचरात जसा सिंह हा मृगेंद्र असतो, तसे नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते. बारा राशींपैकी कर्क राशीत पुष्प नक्षत्र येते. डेल्टा अथवा हामरिन आणि गॅमा व ईटा अशा तार्‍यांचा या नक्षत्रात समावेश होतो. वेदकाळात या नक्षत्राला तिष्य असे नाव होते व सिध्य या नावानेही हे नक्षत्र ओळखले जात होते.

केव्हा होतो गुरुपुष्यामृत योग?

ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग होतो. आज गुरुवार, दि. 28 आक्टोबर रोजी आश्विन वद्य सप्तमीस हा गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजून 41 मिनिटांनी गुरुपुष्यामृत योग सुरू होतो. दुसर्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत हा योग आहे. भारतीय परंपरेप्रमाणे सूर्योदय ते दुसर्‍या दिवशीचा सूर्योदयापर्यंत वार असतो. मध्यरात्रीनंतर इंग्रजी तारीख बदलते; पण वार बदलत नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी 9 वाजून 41 मिनिटांनी सुरू झालेला हा योग दुसर्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत राहणार आहे.

पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे व नक्षत्र देवता बृहस्पती आहे. श्रम, साहसाचा कारक असलेला शनी ग्रह वैभव देणारा आहे, तर देवांचा गुरू असलेली बृहस्पती देवता ही शुभार्शीवाद देणारी देवता आहे. त्यामुळे या नक्षत्राला अधिक महत्त्व आलेले आहे.

सोने खरेदीचे महत्त्व

या मुहूर्तावर सर्वाधिक खरेदी होत असेल, तर ती सोन्याची! सुवर्ण धातू हा राजधातू मानला जातो आणि गुरुपुष्यामृत योगावर त्याची खरेदी केल्यास ती शुभ आणि अक्षय्य स्वरूपाची ठरते, असे म्हटले जाते. दर महिन्याला येणार्‍या पुष्य नक्षत्रावर थोडे-थोडे सोने खरेदी करून त्याचा पुष्य नक्षत्रावर दागिना बनवण्याचाही प्रघात आहे. पुष्य नक्षत्रावर सोने खरेदी केल्याने उत्तरोत्तर समृद्धी प्राप्त होते, अशीही लोकमानसातील भावना आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते व त्यासाठी आधीपासून नियोजनही केले जाते.

गुंतवणुकीसाठी शुभयोग

मालमत्ता गुंतवणूक, गृह प्रवेश, सोन्याप्रमाणे चांदी खरेदी, शैक्षणिक प्रारंभ यासाठीही हा मुहूर्त शुभ मानला जातो. पुष्कराज हे गुरूचे रत्न आहे. या दिवशी पुष्कराज रत्नाची खरेदी करणे अनुकूल ठरते, तसेच पुष्कराज खड्याची अंगठी घेणे लाभदायक ठरू शकते.

श्री महालक्ष्मी पूजन

हा एक शुभ मुहूर्त असल्याने आणि हा योग दिवस-रात्र असल्याने या दिवशी श्री महालक्ष्मीचे पूजन करावे, असेही सांगितले जाते. या शुभ योगावरील श्री महालक्ष्मी पूजनाने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, असे मानले जाते व तशी धार्मिक श्रद्धा आहे.

गुरुपुष्यामृत मुहूर्त

  • गुरुवार, दि. 28 ऑक्टोबर, सकाळी 9 वाजून 41 मिनिटांनी ते दुसर्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत.
  • पुढील गुरुपुष्यामृत शुक्रवार, दि. 25 नोव्हेंबर, सूर्योदयापासून सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटापर्यंत.

Back to top button