विधिमंडळ अधिवेशन : ओला दुष्काळ जाहीर न केल्याने विरोधकांचा सभात्याग | पुढारी

विधिमंडळ अधिवेशन : ओला दुष्काळ जाहीर न केल्याने विरोधकांचा सभात्याग

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विरोधकांनी आज सभात्याग केला. शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकऱ्यांना शेती उभी करायला वेळ लागणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी होती. मात्र सरकारने जाहीर केले नाही. आदिवासी समाजाला खावटी अनुदान देण्याची नितांत गरज असते. तोही निर्णय सरकारने घेतला नाही. एनडीआरएफच्या निकषातील मदतीबाबत काही धोरणात्मक निर्णय जाहीर केला नाही. दुप्पट मदत करतो सांगता मात्र तीही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना जाहीर करता. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण आम्हाला मान्य नाही, असे अजित पवार म्हणाले.

अतिवृष्टीत शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली आहेत, त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. एकीकडे शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचे सरकार जाहीर करत असतानाच आज शेतकरी वीजेचा शॉक घेऊन किंवा रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची मजल मारत आहेत. याबाबत तीव्र नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. सरकारने आजपासून बाधितांना मदत केली जाईल, असे जाहीर करायला हवे होते. मात्र तेही जाहीर केले नाही. विदर्भात गोगलगायीच्या आक्रमणाबाबतही अधिकार्‍यांना अजून आदेश दिलेला नाही. ज्या अपेक्षेने आम्ही सरकारकडे बघत होतो त्याने आमचे समाधान झाले नाही. म्हणून सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. यानंतर सर्व महाविकास आघाडीचे आमदार सभागृहाबाहेर पडले.

हेही वाचा : 

Back to top button