राजगुरुनगर: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाची उपेक्षाच; तरतुद ८७ कोटीची ९ वर्षात खर्च फक्त ३ कोटी | पुढारी

राजगुरुनगर: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाची उपेक्षाच; तरतुद ८७ कोटीची ९ वर्षात खर्च फक्त ३ कोटी

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची ११४ वी जयंती २४ ऑगस्ट रोजी शहरात विविध उपक्रम, कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदानाला ९१ वर्षे पूर्ण झाली.आणखी ९ वर्षांनी बलिदानाला १०० वर्षे होणार आहेत. तरीही हुतात्मा राजगुरू यांचे जन्म ठिकाण असलेल्या त्यांच्या वाड्याच्या नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे काम पूर्णपणे दुर्लक्षित आहे. स्मारकासाठी राज्य शासनाने सन २०१४ मध्ये ८७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून निधीची घोषणा केली होती. त्यातील केवळ ३ कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केला आहे. वाड्यातील पुर्नवसन,थोरला वाडा, देवघर, अँपी थिएटर, बगीचा आदी कामे अपुर्ण आहेत. स्मारकाबद्दल शासकीय आणि राजकीय स्तरावर अनास्था असून हुतात्मा राजगुरूप्रेमी नागरिक, युवकांमधून संताप व्यक्त होत आहे.

हुतात्मा भगतसिंग , सुखदेव यांची पंजाब प्रांतात भव्य स्मारके उभारली गेली. शासकीय स्तरावर जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम होतात. महाराष्ट्रात मात्र क्रांतिकारकांची अद्यापही उपेक्षाच होत आली आहे. राजगुरुनगर येथील भीमा नदी काठावर हुतात्मा राजगुरू यांचा पुरातन वाडा आहे. देशभक्तीची अखंड प्रेरणा देणाऱ्या या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर व्हावे अशी राजगुरुनगर शहरासह तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. काही राजगुरूप्रेमी, संस्था यांनी अनेक वर्ष पाठपुरावा केल्यावर या स्मारकाची काही कामे पुर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर आणि हुतात्मा राजगुरू स्मारकाचा आराखडा एकाच वेळी प्रस्तावित करण्यात आला होता. भीमाशंकर देवस्थानच्या आराखड्याला मान्यता मिळून कामेही सुरू होऊन पुर्ण झाली. स्मारकाचा मात्र राज्यकर्त्यांना विसर पडला. राजकीय कुरघोडीत स्मारकाचे काम मागे पडले. युती सरकारच्या काळात घोषणा होऊन पुढे वाड्यातील जन्मखोली, अर्धाअधिक थोरला वाडा आणि संरक्षक भिंतीचे काम झाले. त्यातही अनेक त्रुटी राहात गेल्याने वाद झाले. आंदोलने झाली. स्मारकाचा ऑक्टोबर २०१४ मध्ये ८७ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित केला. चार वर्षांत त्यातील एकही बाब प्रत्यक्षात आली नाही.

हुतात्मा राजगुरू यांचा गौरव व त्यांच्या नियोजित स्मारकाशी निगडीत विकास कामे व त्यासाठी प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी-
१) सन १९९७ राष्ट्रीय स्मारकाची घोषणा- (मुख्यमंत्री मनोहर जोशी)
२) सन २००७ जन्मखोली काम पुर्ण- निधी जवळपास ८ लाख रुपये- (उपमुख्यमंत्री अजित पवार,स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील)
३)सन २०१२ भीमानदी वरील संरक्षक भिंत -निधी १ कोटी,८७ लाख रुपये- (पुरातत्त्व विभाग,दिलीप मोहिते पाटील)
४)सन २०१३ हुतात्मा राजगुरू यांच्या टपाल तिकिटाचे दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रकाशन(खासदार शिवाजीराव आढळराव पाटील)
५)सन २०१४ थोरला वाडा -९६ लाख रुपये- (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,स्व आमदार सुरेश गोरे)
६)सन २०१८ हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचे स्मृती शिल्प-निधी ६० लाख रुपये- (माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील)
७)सन २०१८ भीमा नदीवर हुतात्मा राजगुरू पुल-१३ कोटी रुपये- (माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील)
८)चांडोली ते राजगुरू वाड्याला जोडणारा प्रगतीपथावर असलेला पुल -५ कोटी रुपये- (आमदार दिलीप मोहिते पाटील)

Back to top button